नगरमध्ये तोतया पोलिसांनी केला मोठा कुटाणा, ज्येष्ठ नागरिकाला ‘असे’ गंडवले

 


अहिल्यानगर - नगर मध्ये पोलीस असल्याची बतावणी करत दोन तोतया पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हाताच्या बोटातील अंगठ्या कडून घेत पोबारा केला आहे. पाईपलाईन रोडवरील अष्टविनायक कॉलनीच्या कमानीजवळ ६ जून रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गणपतराव विष्णु पंदारे (वय ८४, रा. अष्टविनायक कॉलनी, पाईपलाईन रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. ते अष्टविनायक कॉलनीच्या कमानीजवळ आले असता, पाठीमागून दुचाकीवर दोन अनोळखी इसम आले. त्यांनी गणपतराव यांना थांबवून, "आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गळ्यातील चेन आणि हातातील अंगठ्या काढून द्या," असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

घाबरलेल्या गणपतराव यांनी स्वतःच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि ४० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून दिल्या. त्यानंतर त्या भामट्यांनी त्यांच्या जवळील खोट्या अंगठ्या गणपतराव यांच्या हातात देऊन गणेश बुक एजन्सीसमोरून दुचाकीवरून पळ काढला. काही वेळाने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात गर्दी जमली. एका नागरिकाने या घटनेची माहिती गणपतराव यांच्या मुलाला दिली. याप्रकरणी गणपतराव पंदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून त्याने पांढरा शर्ट घातला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गिरी करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments