‘नीट’ नंतर आता ‘टीईटी’ परीक्षेचा पेपरही फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द


मुंबई - राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा  पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी २७ जून रोजी पहाटे छापेमारी करत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भिवंडी येथे टीईटीच्या प्रश्नपत्रिकांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या खबऱ्यांनी दिली होती. परीक्षेचा पेपर पैशांच्या मोबदल्यात विकला जात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत फुटलेली प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची माहिती तातडीने शिक्षण विभागाला देण्यात आली. त्यानंतर परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आल्याने संपूर्ण परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील ४.२८ लाख विद्यार्थ्यांना फटका

यंदाच्या महाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ४५ हजार ५६२ उमेदवारांचा समावेश आहे. परीक्षा रद्द झाल्याने अनेक महिन्यांपासून तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पेपर नेमका कुठून बाहेर आला? तपास सुरू

पेपर नेमका कोणत्या यंत्रणेतून बाहेर आला, तो कोणाकडून लीक करण्यात आला आणि तो संशयितांकडे कसा पोहोचला, याचा शोध पोलीस घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास केला जात आहे.

सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत - अंबादास दानवे

या पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त करत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. दानवे म्हणाले, “या संपूर्ण पेपरफुटीमध्ये सरकारचाच सहभाग आहे. या सरकारला एक साधी टीईटी परीक्षा देखील नीट घेता येत नाही. प्रत्येक वेळी सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत आणि सध्या संपूर्ण राज्य 'भगवान भरोसे' सुरू आहे.”

सरकारच्या भोंगळ कारभारावर टीका करताना दानवे पुढे म्हणाले, "एक गरीब विद्यार्थी परीक्षेसाठी वर्षाभरापासून दिवस-रात्र तयारी करतो. पण परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी जर असे पेपर फुटत असतील, तर विद्यार्थ्यांमधील परीक्षा देण्याचा उत्साह पूर्णपणे संपून जातो. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि निकालावर होतो." ऐन परीक्षेच्या तोंडावर झालेल्या या घोळामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही टीईटी वादाच्या भोवऱ्यात

महाटीईटी परीक्षा यापूर्वीही मोठ्या गैरव्यवहारामुळे चर्चेत आली होती. उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. अनेक उमेदवारांचे गुण अवैधरीत्या वाढवून पात्र ठरवण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. त्या प्रकरणामुळे टीईटी परीक्षेची विश्वासार्हता आधीच धोक्यात आली होती. आता पुन्हा पेपरफुटी झाल्याने परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

परीक्षेसाठी १८ हजार एआय कॅमेरे बसवले होते

विशेष म्हणजे, यंदाची परीक्षा पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. राज्यभरात पेपर क्रमांक १ साठी ७०१ आणि पेपर क्रमांक २ साठी १०२८ अशी एकूण १७२९ परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर १८ हजार एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. राज्य व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण केले जाणार होते.

फेस रेकग्निशन, बायोमेट्रिक आणि मेटल डिटेक्टरची व्यवस्था

प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक पडताळणी, फेस रेकग्निशन आणि हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 'फोटो व्ह्यू' प्रणालीद्वारे बोगस उमेदवार, डुप्लिकेट अर्ज आणि मॉर्फ केलेले फोटो ओळखण्याची तयारीही करण्यात आली होती.

मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रात नेण्यास बंदी घालण्यात आली होती. उमेदवारांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले होते.

कडक सुरक्षा व्यवस्थेनंतरही प्रश्नचिन्ह

एवढ्या व्यापक सुरक्षा उपाययोजना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित देखरेख असूनही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याने राज्य परीक्षा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या पेपरफुटीमागील सूत्रधार कोण, प्रश्नपत्रिका नेमकी कोणत्या टप्प्यावरून बाहेर आली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो उमेदवारांना पुन्हा नव्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार असून, नवीन परीक्षा कधी घेतली जाणार याबाबत शिक्षण विभाग लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.


 

0/Post a Comment/Comments