सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या;पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल


अहिल्यानगर - पती आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येथे पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिरदोस अल्ताफ सय्यद (वय ४५, रा. नुराणी कॉलनी, आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी सोनी उर्फ सना अनिस पठाण (वय २८) हिने १७ जून रोजी सायंकाळी माहेरी गळफास घेत आत्महत्या केली होती. तिचे लग्न झाल्यानंतर ती सासरी आणि माहेरी असतानाही सासरच्या लोकांकडून तिला सातत्याने त्रास दिला जात होता. "तुला मूलबाळ होत नाही" असे म्हणून सासरचे लोक तिची नेहमी हेटाळणी करत असत. तसेच तिला वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करून तिचा मोठा मानसिक छळ केला जात होता. या सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून अखेर तिने माहेरी येत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

या प्रकरणी मयत सना हिचा पती अनिस सलीम पठाण, सासू सलीम पठाण, सासरे सलीम कादर पठाण, भाया शौकत सलीम पठाण व जाव मरियम शौकत पठाण (सर्व रा. येरवडा,पुणे) यांच्या विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments