पारनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, वृद्ध महिलेला कोयत्याचा धाक दाखवून दागिने लुटले


पारनेर - पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथे एक धक्कादायक आणि धाडसी जबरी चोरीची घटना समोर आली आहे. एका ६० वर्षीय वृद्ध शेतकरी महिलेला घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत चार अज्ञात चोरट्यांनी ९६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अलका गुलाबराव करंजुले (वय ६०, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री ११:४० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अलका करंजुले या घरी असताना चार अनोळखी इसम तिथे आले. चोरट्यांनी हातात घातक हत्यार असणारा कोयता घेऊन फिर्यादींना जीवे मारण्याचा धाक दाखवला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि कानातील कर्णफुले जबरदस्तीने ओरबाडून घेतली. दागिने वेगाने ओरबाडल्यामुळे वृद्ध महिलेच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्राव झाला आहे. चोरट्यांनी एकूण ९६,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरी केल्यानंतर आरोपींनी एवढ्यावरच न थांबता, घराबाहेर उभी असलेली 'होंडा शाईन' या दुचाकी गाडीची देखील मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत नुकसान केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलका करंजुले यांनी २६ जून रोजी सकाळी सुपा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(), ३२४(), आणि ३() अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोठुळे हे करत आहेत.

 


0/Post a Comment/Comments