अहिल्यानगर - केडगाव परिसरातील कोतकर मळा येथे जुन्या वादातून दोन कुटुंबात भीषण हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ११ जणांनी एका कुटुंबातील चौघांना कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर यादव कोतकर (वय ३१, रा. केडगाव) हे २१ जून रोजी रात्री आपल्या घराबाहेर उभे असताना ही घटना घडली. आरोपी सहदेव किसन कोतकर, महादेव किसन कोतकर, सागर महादेव कोतकर, शुभम महादेव कोतकर, नंदा सहदेव कोतकर, वैभव खामकर आणि निलेश मोढवे यांच्यासह इतर तीन अनोळखी लोकांनी मिळून ज्ञानेश्वर यांना विनाकारण गाठले. आरोपींनी जुन्या कारणावरून वाद उकरून काढत ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपींनी हातातील कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने आणि काठीने ज्ञानेश्वर यांच्यावर जोरदार हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी पतीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्यांच्या पत्नीलाही आरोपींनी लाकडी काठीने बेदम मारहाण केली. या गोंधळात ज्ञानेश्वर यांच्या आईला आणि भावाला देखील आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ज्ञानेश्वर कोतकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद गोल्हार करत आहेत.

Post a Comment