अहिल्यानगर जिल्ह्यात २९ जून पर्यंत येलो अलर्ट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन



अहिल्यानगर - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात २५ ते २९ जून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मेघगर्जनेच्या वेळी किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडांखाली अथवा झाडांच्या जवळ उभे राहू नये. विजांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या पूर्वसूचना व इशारा मिळवण्यासाठी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडील दामिनी अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे सूचित करण्यात आले आहे. गडगडाटी वादळादरम्यान घरातील कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये व विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. या काळात शेतातील ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल किंवा सायकल यांसारख्या साधनांपासून दूर राहावे.

मोकळी मैदाने, झाडे, उंच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत अथवा दिव्यांचे खांब, धातूंचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर यांच्या जवळ थांबणे अत्यंत धोकादायक ठरू शकते; त्यामुळे अशा ठिकाणांपासून दूर राहावे तसेच सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणार्‍या किंवा लोंबणार्‍या केबल्सपासून अंतर राखावे. रस्त्यांवरील मोठे जाहिरात फलक कोसळून होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी होर्डिंग्सच्या आजूबाजूला थांबू नये. विजा चमकत असताना कोणी मोकळ्या जागेवर असल्यास, सुरक्षेसाठी जमिनीवर गुडघ्यांवर बसून हाताने आपले कान झाकावेत व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झुकवावे, जेणेकरून जमिनीशी शरीराचा कमीत कमी संपर्क येईल.

धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांनी आणि पर्यटकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. धरणाचे पाणी, नदी किंवा कालव्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हा काळ शेतीसाठी महत्त्वाचा असल्याने शेतकरी बांधवांनी वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे होणारे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी वेळेतच नियोजन करावे. शेतकर्‍यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असल्यास, मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच पाळीव जनावरांचेही तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. संकटसमयी नजीकचे पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्र. ०२४१-२३२३८४४ / २३५६९४० किंवा ११२, १०७७  या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

0/Post a Comment/Comments