मुंबई : राज्यातील शिक्षण विभागातील कथित गैरव्यवहार, विशेष शिक्षकांचे प्रश्न आणि प्रशासकीय कारभारावरून विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली. राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार हा शिक्षण विभागात सुरू आहे असा थेट आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अनेक शिक्षकांची चौकशी सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
चर्चेत सहभागी होत आमदार संजय भेंडे यांनीही शिक्षण विभागातील गोंधळ, शिक्षक नियुक्ती प्रक्रिया आणि प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. विशेष शिक्षक, मान्यता प्रक्रिया आणि विविध शासन निर्णयांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेतली. शिक्षण विभागाशी संबंधित ज्या प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे, त्या प्रकरणांचा आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.
भोयर म्हणाले की, सदस्यांनी मांडलेल्या सूचना आणि तक्रारी शासन गांभीर्याने घेत आहे. विभागातील कोणत्याही अनियमिततेकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. संबंधित चौकशींची माहिती घेऊन आवश्यक त्या पातळीवर कार्यवाही केली जाईल. तसेच शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला भ्रष्ट ठरविणे योग्य नसल्याचे नमूद केले. राज्यातील लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्था समाज घडविण्याचे काम करत असून व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी विधायक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष शिक्षकांच्या नियुक्त्या, सेवासुरक्षा, मान्यता प्रक्रिया आणि शिक्षण विभागातील कथित गैरव्यवहार या मुद्द्यांवर झालेल्या चर्चेमुळे सभागृहात गंभीर चर्चा झाली. शिक्षण विभागातील काही शिक्षकांची चौकशी सुरू आहे. ह्या चौकशींचा आढावा घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन भोयर यांनी दिले.

Post a Comment