ऑपरेशन टायगर ३.० सुरू, ठाकरे गटाचे १४ पेक्षा जास्त आमदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा



मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर ३.०'ची चर्चा रंगली असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात आल्यानंतर आता १४ पेक्षा जास्त आमदारही आमच्यासोबत येतील, असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "ऑपरेशन टायगर ३.० सुरू झाले आहे. थोडं थांबा, १४ पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील. एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. हे स्वतः आदित्य ठाकरे यांनीही म्हटले आहे. जेव्हा शिंदे दाढीवर हात फिरवतात, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होते."

गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, "ऑपरेशन ३.० ला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. जेव्हा ते दाढीवर हात फिरवतात, तेव्हा 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होते. हे खुद्द उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनीही कबूल केले आहे." या शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर खोचक टोला

फुटलेल्या ६ खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे उद्यापासून तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात फिरलेच पाहिजे; मुलाने (आदित्य ठाकरेंनी) काम केले नाही, तर बापाने ते केलेच पाहिजे.”

संजय दिना पाटलांना सल्ला

पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेले खासदार संजय दिना पाटील यांना गुलाबराव पाटलांनी जाहीर सल्ला दिला आहे. "पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आणि आपला आरसा आहे, आरशाला दगड मारू नये. राजकारणात वाद होत असतात, पण मारामारी किंवा शिवीगाळ करणे चुकीचे आहे. संजय दिना पाटील यांनी या प्रकरणी 'सॉरी' म्हणायला काहीच हरकत नाही," असे खडेबोल त्यांनी सुनावले.


 

0/Post a Comment/Comments