सुपा - जमिनीच्या वादातून पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे पाच ते सहा अनोळखी इसमांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास वाडेगव्हाण येथील गट नं. ३८४ मध्ये घडली.
याबाबत संदीप बापू काकडे (वय २७) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह शेतातील पत्र्याच्या खोलीत असताना पाच ते सहा अनोळखी इसम आणि दोन महिला तिथे आल्या. शेतजमिनीच्या तारेवरून झालेल्या वादातून या संशयितांनी फिर्यादीच्या घराच्या दिशेने दगडफेक केली आणि जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे दोन खोल्यांचे बांधकाम पाडून टाकले.
बांधकाम पाडल्यानंतर संशयितांपैकी एकाने फिर्यादीच्या दिशेने पिस्तुल रोखले आणि गोळीबार केला. सुदैवाने, गोळी फिर्यादीला न लागता हवेतून निघून गेली. याशिवाय, संशयित महिला आणि इतर अनोळखी इसमांनी फिर्यादीला मारहाण केली.
या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ११५(२), १८९(३), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(४), ३५२ आणि आर्म ॲक्ट ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घटनास्थळी पिस्तुल, लोखंडी टिकाव, फायटर, कोयते, लाकडी दांडके, तसेच फोक्सवॅगन झेटा कार, स्कुटी मोपेड, हायवा ट्रक आणि पिवळ्या रंगाची जेसीबी या वाहनांचा वापर केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून, सुपा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment