भावी पत्नी सिया गोयलने प्रियकराच्या मदतीने केतन अग्रवालला नेमकं कसं मारलं?; लोहगडावर काय घडलं?



पुणे - जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला एक दुर्दैवी अपघात वाटत होती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या घटनेमागील एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वास्तव समोर आले आहे. हा मृत्यू अपघात नसून, केतनची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक थंड डोक्याने केलेला ‘मर्डर प्लॅन’ असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कलम १०३ आणि ६१(२) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली आहे.

मृत केतन अग्रवाल हा पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता. परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून तो नुकताच वडिलांच्या व्यवसायात रुजू झाला होता . १९ फेब्रुवारी रोजी सिया गोयल हिच्यासोबत त्याचा साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचा विवाह जयपूरमधील एका भव्य पॅलेसमध्ये पार पडणार होता. या शाही विवाहासाठी १७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून व्हीआयपी पाहुण्यांसाठी दोन खाजगी विमानेही बुक करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली होती. मात्र, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी लग्नाचे ठिकाण अद्याप ठरले नसल्याचे सांगत विमाने आणि पॅलेसच्या काही गोष्टी काल्पनिक असल्याचे नमूद केले आहे.

हत्येचा कट पूर्वनियोजित

सिया गोयलचे पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकत असताना चेतन बाबूलाल चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होत. केतनसोबत लग्न करण्याची सियाची मुळीच इच्छा नव्हती आणि केतन त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होता. यामुळे या दोघांनी केतनचा काटा काढण्याचे ठरवले. हत्येचा हा प्रयत्न त्यांनी यापूर्वीही केला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते, तेव्हा सियाने स्वतःच केतनचा पासपोर्ट चोरून लपवून ठेवला, जेणेकरून तो दौरा रद्द व्हावा . इतकेच नव्हे तर, गेल्या २० दिवसांत सियाने केतनला तब्बल तीन वेळा लोहगडावर नेले होते, जे केवळ हत्येसाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी केलेली रेकी होती, असा आरोप केतनच्या वडिलांनी केला आहे.

१८ जून २०२६ रोजी सियाचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने ती केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर गेली. कटानुसार तिचा प्रियकर चेतन चौधरी हा देखील तिथे पोहोचला होता. स्वतःची ओळख लपवण्यासाठी चेतनने भर उन्हात अंगात जाड ‘हुडी’ (जॅकेट) घातली होती आणि कानात हेडफोन लावले होते. तसेच त्याने स्वतःचा फोन न आणता एका कामगाराचा फोन वापरला होता.  दुपारी दीड वाजेच्या सुमारास, किल्ल्याच्या पश्चिम बाजूला एका निर्जन कड्यावर फोटोसाठी पोज देत असताना, सिया आणि चेतनने संधी साधून केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.  त्यानंतर सियाने केतनचा पाय घसरल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दरम्यान, घटनेची गंभीरता ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. भर उन्हात ‘हुडी’ घालून फिरणाऱ्या त्या संशयित तरुणानं पोलिसांच्या मनात शंका निर्माण केली होती. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, सिया आणि चेतन यांच्यातील संशयास्पद हालचाली आणि इशारे पोलिसांच्या नजरेत आले. तांत्रिक पुराव्यांच्या (CDR, IPDR एनालिसिस) आधारे पोलिसांनी चेतन चौधरीला ताब्यात घेतले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


लग्न ठरल्यापासून सियाचे २००४ फोन कॉल, २३८ तास गप्पा

पोलिसांनी जेव्हा सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांचे मोबाईल रेकॉर्ड्स (CDR) तपासले असता त्यांच्यातील गुप्त प्रेमसंबंधांचा उघड पर्दाफाश झाला. तपासात समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १८ जून या अवघ्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर संभाषण झाले होते. तसेच या सहा महिन्यांत त्यांनी एकूण २३८ तास एकमेकांशी संवाद साधला होता. यावरून या दोघांनी किती योजनाबद्ध पद्धतीने केतनचा काटा काढण्याचा कट रचला होता हे समोर आले आहे.

चेतनच्या तोंडावर मास्क, अंगावर हुडी, डोक्यावर हेडफोन्स

प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झाले आहे. एका सीसीटीव्हीमध्ये या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्याने दोघांनी केतनची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तसेच लोहगडावर आधी केतन आणि सिया पोहचले होते. त्यानंतर चेतनही लोहगडावर दाखल झाला होता. तसेच केतनला लोहगडावरुन ढकलण्याआधीचा फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये चेतनने तोंडावर काळं मास्क, अंगावर हूडी, डोक्यावर हेडफोन्स घालून लोहगडावर प्रवेश केला. तसेच केतनचे चेतनकडे लक्ष जाऊ नये यासाठी जेव्हा एकमेकांच्या बाजूने जातात तेव्हा सिया लगेच पाठमोरी उभी राहते. त्यामुळे केतनचे लक्षही सियाकडे जाते.


 

0/Post a Comment/Comments