मुंबई - मुळची अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरची रहिवासी असलेली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (वय ३०) हिने साडीने गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. संचिताने इतके टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून तिचे चाहते आणि सह कलाकार धक्क्यात आहेत. विक्की कौशल याच्या गाजलेल्या 'छावा' सिनेमात तिने तारा राणी यांचा रोल साकारला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संचिता मुंबईजवळील नालासोपारा परिसरातील अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होती. १४ जून रोजी संध्याकाळी ६:३० ते ७ च्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
संचिताने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडलेली नाही. या प्रकरणाचा सखोल तपास अचोले पोलीस करत असून, संचिताच्या कुटुंबीयांची आणि जवळच्या मित्रांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तिच्या या आत्महत्येमागे व्यावसायिक ताणतणाव होता की काही वैयक्तिक कारण, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
एक तरुण आणि आश्वासक अभिनेत्री म्हणून संचिता उगले हिने सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले होते. तिने अनेक लोकप्रिय हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. कुमकुम भाग्य’, ‘दिलवाली दुल्हा ले जायेगी’ आणि ‘वागळे की दुनिया’. ‘वागळे की दुनिया’ या गाजलेल्या मालिकेत तिने साकारलेली ‘रुचिता’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. तसेच तिने ‘सायलेन्स २’ आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ‘छावा’ सारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय ‘रंगबाजी दिलों की’ आणि प्रसिद्ध निर्माती ‘गुल खान’ यांच्या प्रोजेक्ट्समध्येही तिने काम केले होते.
संचिता उगले ही अस्सल मराठमोळी होती. पण हिंदीत तिने आपला चांगला जम बसवला होता. संचिता अहिल्यानगरच्या संगमनेरची राहणारी होती. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या संचिताने अल्पावधीतच टीव्ही इंडस्ट्रीत जम बसवला होता. लहानपणी टीव्ही सीरिअल पाहायची. त्यामुळे आपणही अभिनेत्री व्हावं असं तिला वाटायचं. त्यामुळे तिने नगरला नाटकात काम करायला सुरुवात केली होती. छोट्या छोट्या भूमिका ती साकारायची. त्यानंतर तिचं काम पाहून तिला मोठ्या भूमिकाही मिळू लागल्या.
२०२३ नंतर संचिताच्या करिअरने वेग घेतला. तिला कुमकुम भाग्यमध्ये दीया टंडनची व्यक्तीरेखा साकारायला मिळाली. त्यामुळे तिच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. त्यानंतर संचिताने मागे वळून पाहिलं नाही. या मालिकेने केवळ मला ओळखच निर्माण करून दिली नाही तर माझ्या आईवडिलांनाही अभिमान वाटण्याची संधी दिली, असं संचिता नेहमी म्हणायची. जवळपास दीड वर्ष ती या मालिकेत काम करत होती. या काळात तिने एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलं.

Post a Comment