६ लाखांच्या थकबाकीसाठी जेलमध्ये गेला अन् २४ तासांत ‘चमत्कार’ झाला; नेमकं काय घडलं...?



श्रीरामपूर - ‘पैसे तर देणार नाही आणि स्वतःला दिवाळखोरही जाहीर करणार नाही,’ अशी ताठर भूमिका घेत न्यायालयाच्या आदेशाला वारंवार केराची टोपली दाखवणं एका कर्जदाराला चांगलंच महागात पडलं. श्रीरामपूरच्या दिवाणी न्यायालयाने या थकबाकीदाराला थेट एक महिन्यासाठी दिवाणी कारावासाची हवा खाण्याची शिक्षा सुनावली.

​वित्तीय संस्थेकडून संबंधित कर्जदाराने कर्ज घेतले होते. मात्र, त्याची परतफेड न केल्याने लवाद न्यायाधिकरणाने ६ मार्च २०१८ रोजी ६ लाख ३७ हजार ९३४ रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता. पैसे वसूल होत नसल्याने न्यायालयात अंमलबजावणी याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने यापूर्वी कर्जदाराविरुद्ध अटक वॉरंटही काढले होते, पण ‘भाई’ काही बधायला तयार नव्हते.

१९ जून रोजी हे प्रकरण दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आशिष बी. मार्लेचा यांच्यासमोर आले. न्यायालयात हजर असताना संबंधित व्यक्तीने आपण वाहनचालक असल्याचे सांगितले. परंतु, थकबाकीपोटी एक रुपयाही भरणार नाही आणि स्वतःला दिवाळखोरही घोषित करणार नाही, अशी हेकेखोर भूमिका त्याने घेतली. कर्जदार जाणीवपूर्वक न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करत असल्याचे न्यायाधीशांच्या तत्काळ लक्षात आले. अखेर न्यायालयाने कायद्याचा बडगा उगारत त्याची थेट राहाता येथील दिवाणी कारागृहात एक महिन्यासाठी रवानगी करण्याचे आदेश दिले.

थकबाकी न्यायालयात जमा

​न्यायालयाचा दणका बसताच कर्जदाराची रवानगी तुरुंगात झाली खरी, पण तिथे जाताच ‘शहाणपण’ सुचले. भाऊ तुरुंगात गेल्याचे पाहताच, त्याच्या भावाने दुसऱ्याच दिवशी धावपळ करत न्यायालयाने निश्‍चित केलेली संपूर्ण थकबाकीची रक्कम न्यायालयात जमा केली आणि संबंधित व्यक्तीची तुरुंगातून सुटका झाली.

 


0/Post a Comment/Comments