अहिल्यानगर - स्वस्त दरात सोने उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अविनाश नलावडे (रा. सणसवाडी, ता. मानगाव, जि. रायगड) यांना निर्जन ठिकाणी बोलावून मारहाण करत तब्बल 52 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लुटणार्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 26 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नलावडे यांच्याशी संशयित आरोपी राजू मोहिते व अक्षय मोहिते यांची ओळख होती. दोघांनीही फिर्यादीकडे काम करताना त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर वेळोवेळी स्वस्तात सोने उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी नलावडे यांना व्यवहारासाठी तयार केले. 4 जून रोजी सायंकाळी बुरुडगाव (ता. नगर) शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळील निर्जन ठिकाणी फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांना बोलावण्यात आले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला. मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 52 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून आरोपी पसार झाले. या घटनेनंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि व्यावसायिक तपास कौशल्याच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झेंडीगुळा लोणी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिवाजी उर्फ शिवा विठ्ठल मोहिते (वय 52), राजू उर्फ चंदू रामदास मोहिते (वय 36), अक्षय उर्फ आकाश रामदास मोहिते (वय 27), छगन दशरथ मोहिते (वय 36) आणि दिनेश सुदाम जाधव (वय 24) अशी आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून 16 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम, 1 लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 8 लाख रुपयांची स्विफ्ट कार, बनावट सोन्याची नाणी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता असा 26 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment