अहिल्यानगर - नगर पुणे महामार्गावर वाहनचालकांना रात्रीच्या वेळी अडवून लुटण्याचे गेल्या काही दिवसांपासून थांबलेले सत्र पुन्हा सुरु झाले आहे. चास घाटात लघुशंकेसाठी थांबलेल्या किराणा व्यावसायिक तरूणाला दोन अनोळखी इसमांनी अडवून लाकडी दांडक्याने मारहाण करत लुटल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी पवन अशोक गव्हाणे (वय २६, रा. गुंडेगाव, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पवन गव्हाणे यांचे सुपा (ता. पारनेर) येथे किराणा दुकान आहे. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८.२० च्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे आपले किराणा दुकान बंद केले व ते त्यांच्या मोटारसायकलवर नगरकडे येण्यास निघाले होते. रात्री ८.४५ च्या सुमारास ते चास घाट परिसरातून जात असताना आर्मीच्या फलकाजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्या दिशेने येताना दिसले. त्यांना पाहून गव्हाणे यांनी दुचाकी सुरू करून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एका इसमाने त्यांची दुचाकी ओढून खाली पाडली. त्यामुळे गव्हाणे हेही खाली पडले.
यानंतर दोघांनी त्यांना आणि त्यांची दुचाकी रस्त्यापासून काही अंतरावरील डोंगराच्या बाजूला नेले. तेथे त्यांनी गव्हाणे यांना, तू कुठला आहेस आणि तुझ्याकडे काय काय आहे, ते काढून दे, असे म्हणत धमकावले. त्यातील एकाने गव्हाणे यांना मारहाण केली. मारहाण करून धमकावल्यानंतर संशयित आरोपींनी गव्हाणे यांच्या खिशातील ४१ हजार ५०० रूपयांची रोख रक्कम, घड्याळ आणि चांदीचे ब्रेसलेट असा एकूण ५१ हजार ५०० रूपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर त्यांना मोटारसायकलवर बसवून मागे न पाहता निघून जा असे धमकावले.
त्यानंतर गव्हाणे यांनी तेथून जवळच असलेल्या एका हॉटेल मध्ये जावून डायल ११२ वर पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलीस तेथे आले. त्यांनी लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत ते पसार झाले होते. या प्रकरणी पवन गव्हाणे यांनी १९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा लुटारुंच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment