राहुरी - विवाहासाठी वधू मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन तरुणांची एकूण 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार राहुरी तालुक्यातील कणगर आणि श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणातील संशयित एजंट महिलेला ग्रामस्थांनी पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिलेसह सात जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कणगर तसेच श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील काही तरुण विवाहासाठी वधूच्या शोधात होते. याचदरम्यान त्यांची एका एजंट महिलेशी ओळख झाली. या महिलेने विवाह जमवून देण्याचे आश्वासन देत कणगर येथील एका तरुणाकडून चार लाख रुपये, तर अन्य दोन तरुणांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये, अशी एकूण 14 लाख रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे.
गेल्या वर्षभरात या तीन तरुणांचे विवाह त्यांच्या नातेवाईकांनी स्वतःच्या खर्चाने लावून दिले. मात्र, विवाहानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच संबंधित नववधू घर सोडून निघून गेल्याचे समोर आले. त्यानंतर नवरदेवांच्या नातेवाईकांनी नववधूंच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना पुन्हा सासरी पाठविण्याची विनंती केली. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्याकडून टाळाटाळ करणारी उत्तरे मिळत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान, 19 ऑक्टोबर रोजी संबंधित एजंट महिला स्वत:च्याच विवाहासाठी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती नवरदेवांच्या नातेवाईकांना मिळाली. त्यानंतर कणगर आणि अशोकनगर येथील काही महिला व पुरुषांनी तिच्यावर पाळत ठेवली. ती आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी तिला पकडले. त्यानंतर तिला राहुरी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्रिशला भारत खिल्लारे, रा. मराठा हॉटेलजवळ, शिवनेरी अपार्टमेंट, तरोडा बुद्रुक, ता. जि. नांदेड, असे संबंधित महिलेचे नाव असून या घटनेप्रकरणी कणगर येथील एका इसमाच्या फिर्यादीवरून महिलेहसह बाबा काळे (रा. माजलगाव, जि. बीड), उषा राठोड (रा. वाशिम), रेखा भोसले (रा. नांदेड), आशिष (पुणे माहित नाही), प्रियंका दिगंबर भोसले (रा. सोनखेड, ता. देगलूर), निकिता सखाराम गोळे (रा. भिवगाव बु. ता. सावखेड) व इतर दोन अनोळखी लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहाच्या नावाखाली फसवणूक करणार्या संपूर्ण टोळीचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि फसवणूक झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Post a Comment