अहिल्यानगर (प्रतिनिधी) - केडगाव देवी मंदिर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका विवाहित महिलेचा तिच्या प्रियकरानेच गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी (दि.२४ फेब्रुवारी) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. संगीता नितीन जाधव (वय ३५, रा. पारगाव खंडाळा, जि.सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, खून करणारा व्यक्ती पसार झाला असून त्याचा शोध कोतवाली पोलीस घेत आहे.
याबाबत मयत संगीताची बहिण संगीता सचिन जाधव (वय ४०, रा. मोहिनीनगर, केडगाव)यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, त्यांची बहिण मयत संगीता हिचा विवाह १८ वर्षापूर्वी नितीन फुलचंद जाधव याच्याशी झाला होता. तिला १ मुलगा व १ मुलगी आहे. मयत संगीता हिचा पती नितीन जाधव यास दारूचे व्यसन असल्याने व तो तिला वारंवार शिवीगाळ मारहाण करत असल्याने ती मागील सहा सात वर्षापासून त्याच्या सोबत राहात नव्हती, दरम्यानच्या काळात तिची ओळख सेंट्रींग कामे घेणाऱ्या ठेकेदार सारस सुरवसे याच्याशी झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याने ती दोन्ही मुलांसह सारस याच्या सोबत गेल्या ४ वर्षांपासून पानमळा, ता. खेड, जि. पुणे येथे पती पत्नी प्रमाणे राहात होती.
गेल्या काही दिवसांपासून सारस तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करू लागला होता. ही माहिती मिळाल्यावर तिची आई भामाबाई माने हीने खेड येथे जावून त्यांना समजून सांगितले. त्यानंतर ३ फेब्रुवारीला त्या दोघांसह तिच्या मुलांना काही दिवसासाठी केडगाव येथे फिर्यादीच्या घरी घेवून आली. सारस सुरवसे याला खेड येथे काही कामधंदा नसल्याने तो नगरमध्येच कामधंदा करून भाड्याने खोली घेवून येथे राहतो असे फिर्यादीला म्हणाला. त्यानंतर तो नगरमधील शनिचौकात जावून बिगारी कामही करू लागला होता.
सोमवारी (दि.२४ फेब्रुवारी) रात्री जेवण झाल्यानंतर ते दोघे बहिणीच्या घरातील रूममध्ये झोपण्यासाठी गेले. थोड्या वेळाने हॉल मध्ये झोपलेल्या फिर्यादी व मुलांना रूम मधून भांडणाचा आवाज आल्याने त्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र १५ -२० मिनिटे दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर सारस याने दरवाजा उघडला असता तो छताच्या लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्याला सोडवून रुममध्ये पाहिले असता संगीता ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यावेळी सारस याला विचारले असता त्याने शिवीगाळ करत फिर्यादीला धक्का मारून तो घरातून पळून गेला.
फिर्यादी हिने आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक जमा झाले त्यांनी रुग्णवाहिका व पोलिसांना बोलावले. बेशुध्द अवस्थेत असलेल्या सांगितला रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तीस उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता तिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. त्यामुळे मंगळवारी (दि.२५ फेब्रुवारी) रात्री उशिरा मयत संगीता हिचा प्रियकर सारस सुरवसे याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
Post a Comment