वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती: निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या आरोपांनी उडाली खळबळ


मुंबई - वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी 5 कोटी ते 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे की, मी एन्काऊंटर करू शकतो. माझ्यात दम होता. हे त्यांना माहिती होते म्हणून त्यांनी सायबरमधून तिकडे बोलवून घेतले. मी काही माझा मोठेपणा सांगत नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

रणजित कासले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ बीडला घाबरतात. ते तिथे येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिथे सभा झाली, पण फडणवीस आले नाहीत. पोलिस अधिकारी म्हणून मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची लाज वाटते. 10 वर्षात त्यांनी काय केले. त्यांच्या पत्नी पोलिसांच्या पैशावर आपला खर्च भागावतात असा आरोपही त्यांनी केला आहे.

असा केला जातो फेक एन्काऊंटर

रणजित कासले म्हणाले की, एन्काऊंटर करण्यापूर्वी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिवांची एक गुप्त बैठक होते. या बैठकीत ठरवले जाते की प्रकरणामध्ये काय करायचे. मग एक 5 ते 6 विश्वासू लोकांची टीम तयार केली जाते. मग ठरलेल्या ठिकाणी जातात. यामध्ये पोलिसांची टीम तयार केली जाते. त्यांना 5 कोटी ते 50 कोटी अशी ऑफर दिली जाते, यासह आमचे सरकार आहे तुम्हाला पुन्हा नौकरीमध्ये घेतले जााईल, चौकशीमधून तुम्हाला बाहेर काढू असे आश्वासन दिले जाते.

गृहमंत्र्यांना आरोपी करा

रणजित कासले म्हणाले की, अक्षय शिंदे प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, अशी बातमी मी टीव्हीवर बघितली. ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. एसआयटीची बसवायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा, तरच यामधून सत्य समोर येईल. त्यांचे हातपाय बांधलेले होते यातून तो बोगस एन्काऊंटर होता असा आरोप कासले यांनी केला आहे. तर हे सरकार आणि विरोधक नंपुसक आहेत, अक्षय शिंदे प्रकरणी आरोपी करायचे असेल तर ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले पाहिजे.

कोण आहेत रणजित कासले? या आधीही केले अनेक दावे

रणजित कासले हे निलंबित पोलिस अधिकारी आहेत. ते परराज्यात तपासासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा तडजोड करत पैसे घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा विषय राज्यपातळीवर पोहोचल्याने पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर कासले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे पोलिस अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यांनी आपल्या व्हिडिओत माजी मंत्री धनंजय मुंडे व सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी गजाआड असणाऱ्या वाल्मीक कराडचेही नाव घेतले होते. आता त्यांनी थेट आपल्याला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचे म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments