नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील दहिगाव येथील श्रीराम मंदिरांची दानपेटी फोडणारा आरोपी तालुका पोलिसाच्या पथकाने १२ तासाच्या आत जेरबंद केला आहे. गणेश सोन्याबापू हंबर्डे (वय २५, रा. दहिगाव ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे.
दहीगाव येथे प्रसिद्ध श्रीराम मंदिर असून या मंदिरात परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदीर ट्रस्टच्या वतीने मंदिरात दानपेटी ठेवलेली असून त्यात भाविक इच्छेनुसार रोख रक्कम दान म्हणून टाकत असतात. या जमा झालेल्या रकमेतून मंदिराच्या परिसरात विविध कामे केली जातात. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नागेश तुळशिराम वाघ हे ४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दर्शनासाठी गेले तेव्हा दानपेटी व्यवस्थित होती. त्यानंतर ते पुन्हा ५ जून रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे देवदर्शन करण्यासाठी गेले असता त्यांना मंदीराचे सभामंडपात ठेवलेल्या दान पेटीचे कुलुप तुटलेले दिसले. त्यानंतर गावातील इतर लोकही तेथे आले. त्यांनी दानपेटी उघडून पाहिली असता त्यातील अंदाजे ६ ते ७ हजारांची रोकड चोरीला गेलेली दिसली.
याबाबत नागेश वाघ यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली. त्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरु केला. तांत्रिक तपास करून काही वेळातच सदर चोरी गावातीलच गणेश सोन्याबापू हंबर्डे याने केल्याचे तपासात निष्पन्न करून १२ तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे स. पो.नि.प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे, पो. हे.कॉ. शरद वांढेकर, गणेश लबडे, नगर दक्षिण मोबाईल सेल विभागाचे पो. कॉ.नितीन शिंदे आदींच्या पथकाने केली.
Post a Comment