नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू असताना आता इस्त्रायलने आणखी एका देशावर हल्ला केला. इस्रायलने इराणवर ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून यामध्ये इराणचे सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद बाघेरी आणि इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख मेजर जनरल होसैन सलामी यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणमधील प्रसिद्धीमाध्यमांनी दिली आहे.
इराणला अणवस्त्र संपन्न देश बनू देणार नाही, हे इस्रायल आधीपासून सांगत आहे. हेच त्यांनी आज सिद्ध करुन दाखवले. इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणने आपल्या दोन खास माणसांना गमावले. IRGC चीफ ऑफ स्टाफ जनरल होसैन सलामी यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. इस्रायली सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला आहे. तसेच इराणी लष्करी आणि अणु तळांना देखील इस्रायलने टार्गेट केले आहे. शुक्रवारी सकाळी हा हल्ला केल्याचं सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयएएफच्या डझनभर फायटर विमानांनी इराणवरील हल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. ज्यात इस्त्रायलने इराणच्या विविध भागातील अण्वस्त्र ठिकाणांसह डझनभर लष्करी तळांवर हल्ले केले. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) च्या माहितीनुसार, तब्बल २०० हून अधिक लढाऊ विमानांचा वापर करून इराणमधील विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले.
यामध्ये इराणचे आणीबाणी नियंत्रण कमांडरही ठार झाले आहेत. “या तिघांनाही आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा हिंसाचार घडवण्यात जबाबदार धरले जात होते. त्यांचा मृत्यू ही संपूर्ण जगासाठी एक दिलासा देणारी बाब आहे,” असे IDF ने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
सध्याच्या घडीला इराण अण्वस्त्र निर्मितीच्या अगदी जवळ आहे. इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणातील विनाशकारी शस्त्रे इस्रायल राष्ट्रासाठी आणि संपूर्ण जगासाठी धोकादायक आहेत, याच कारणातून इस्त्रालयने इराणवर हल्ला केला आहे. त्यासाठी इस्त्रालयने लष्करी तळे आणि अण्वस्त्र ठिकाणांना टार्गेट केले आहे.
इस्रायलने इराणच्या अणवस्त्र तळांना लक्ष्य केले असून या तळांचे मोठे नुकसान करण्यात इस्रायल यशस्वी ठरला आहे. या हल्ल्यात इराणच्या दोन अणवस्त्र वैज्ञानिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराणच्या अणूबॉम्ब विकसित करण्याच्या कार्यक्रमाला खीळ बसणार आहे. डॉ. मोहम्मद तेहरांची आणि डॉ. फेरेयदून अब्बासी या इराणच्या दोन अणवस्त्र वैज्ञानिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणच्या राजधानीत तेहरानमध्ये जोरदार स्फोट झाले, आणि शहरभर धुराचे लोट दिसून आले. यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्राइल कात्झ यांनी संपूर्ण देशात विशेष आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. शाळांना बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. इस्रायलने केलेल्या या हल्ल्याला इराण काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इराणने आक्रमक भूमिका घेतली तर जगात आणखी एका युद्धाला सुरुवात होऊ शकते.
Post a Comment