शॉपिंग मॉलला भीषण आग, ६० जणांचा होरपळून मृत्यू
बगदाद: पूर्व इराकमधील अल-कुट शहरात असलेल्या शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान ६० जणांचा मृत्यू झाला आहे. इराकची सरकारी वृत्तसंस्था आयएनएला प्रांताचे गव्हर्नर मोहम्मद अल-मियाही यांनी गुरुवारी याबद्दलची माहिती दिली.
सोशल मीडियावर आगीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पाच मजल्यांच्या इमारतीला भीषण स्वरुपाची आग लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शॉपिंग मॉल रात्रभर जळत होता. त्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु होते.
प्रांताच्या गव्हर्नरनी आगीच्या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. तपासाचा प्राथमिक अहवाल ४८ तासांमध्ये येईल. इमारत आणि मॉलच्या मालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. 'जेव्हा आगीची घटना घडली तेव्हा अनेक जण त्यांच्या कुटुंबासह जेवत होते. बरेच जण शॉपिंग करत होते. आमच्यावर एक मोठं संकट कोसळलं आहे,' अशी माहिती गव्हर्नरनी दिली.
बगदादच्या आग्नेयला १६० किलोमीटर अंतरावर अल-कुट शहर आहे. रात्रीच्या सुमारास लागलेली आग पहाटेपर्यंत भडकलेली होती. पहाटे ४ पर्यंत रुग्णवाहिका जखमींना रुग्णालयांमध्ये पोहोचवत होत्या. जखमींमुळे रुग्णालयांमधील सगळे बेड भरले. डॉक्टरांच्या सु्ट्ट्या रद्द करण्यात आल्या.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून जखमींचे जीव वाचवले. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली. आगीच्या कारणांचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेनंतर प्रांतात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
एएफपी वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ज्या मॉलमध्ये आगीची घटना घडली, त्याचं उद्घाटन होऊन आठवडादेखील उलटलेला नाही. अवघ्या ५ दिवसांपूर्वीच मॉलचं उद्घाटन झालेलं आहे. आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली. पण अवघ्या काही मिनिटांमध्ये आग अन्य मजल्यांवर पोहोचली. आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
याआधी २०२३ मध्ये इराकच्या एका लग्न सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली होती. विवाह समारंभ सुरु असताना लागलेल्या आगीत १०० जणांचा मृत्यू झाला होता, तर १५० जण जखमी झाले होते.
Post a Comment