आखाती देशांत निर्यातीत घट, कांद्याचे भाव घसरण्याची चिन्हे: शेतकऱ्यांची चिंता वाढली



अहिल्यानगर - जिल्ह्यात कांद्याचे दर मागील काही महिन्यांपासून सुमारे १३०० ते १७०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर आहेत. त्यातच आता, आखाती देशात होणारी निर्यात घटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर शेजारील राष्ट्र असलेल्या बांग्लादेशाने स्वत:च कांदा पिकवायला सुरवात केल्याचाही परिणाम कांद्यावर झाला आहे. त्यामुळे पुढील काळात कांद्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

खते, बियाणे, किटक नाशकांसह मशागतीचा खर्च वाढत चालला आहे. पण त्या तलुनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात आहे. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळावा एवढीच शेतकऱ्याची अपेक्षा आहे. परंतू, किरकोळ अपवाद वगळता शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आल्याचे चित्र आहे.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानंतर काही महिने कांद्याचे दर तेजीत राहिले. निवडणुकानंतरमात्र, टप्प्याटप्प्याने हे दर पुन्हा घसरले. २८ जूनला जिल्ह्यात एक नंबर कांदा १४०० ते १८०० रूपये प्रतिक्विंटल तराने विकला गेला होता. तर २६ जुलैला वांबोरी उपबाजारात हा कांदा १३०० ते १७०० रूपये दराने विकला गेला. मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर दिसत असले तरी हे दर परवडणारे नाहीत.

दरवाढ मिळावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. पण दुसरीकडे दुबई, सिंगापूर, मलेशियासह इतर देशांमध्ये होणारी निर्यात घटली आहे. भारतीय कांद्याला या देशांमध्ये चीन व पाकिस्तानच्या कांद्याच्या दराशी सामना करावा लागत आहे. चिन व पाकिस्तानचा कांदा तेथे सुमारे १८ रूपये किलोने उपलब्ध होतो, तर भारतीय कांदा सुमारे २३ रुपये असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाव आणखी घसरण्याची शक्यता

नाफेडचा कांदा दसऱ्यानंतर मार्केटला येतो. त्यावेळी पुन्हा भाव घसरतात. सद्यस्थितीत निर्यातीवर परिणाम झाला आहे. कोलंबो, दुबई, मलेशियाकडे कांद्याची निर्यात कमी झाली. त्यातच चीन-पाकिस्तान कांदा इतर देशात स्वस्त असल्याने निर्यात कमी झाली. याचा परिणाम दरावर दिसणार आहे. तसेच पुढील काळात दक्षीणचा कांदा १५ ऑगस्टनंतर मार्केटला यईल. त्यामुळे कांद्याचे बारा ते पंधरा रूपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments