केसात गजरा माळणं अभिनेत्रीला पडलं महागात, भरावा लागला 1.25 लाख रुपये दंड



ऑस्ट्रेलिया - केसात गजरा माळायला कुणाला नाही आवडत? कितीही साज-श्रृंगार केला तरी केसात गजरा माळल्याशिवाय सगळंच अपूर्ण... पण, हाच केसात माळलेला गजरा तुम्हाला कधी अडचणीत आणू शकतो? असा साधा विचारही तुम्ही कधी केलाय का? पण, केसात गजरा माळणं एका अभिनेत्रीला भलतंच महागात पडलंय. केसाल माळलेल्या गजऱ्यामुळे अभिनेत्रीला मोठा भुर्दंड पडला असून तब्बल लाखोंचा दंड भरावा लागला आहे.

मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती मल्याळी समुदायानं आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नला गेली होती. पण, तिथे पोहोचताच तिच्यासोबत अशी घटना घडली, ज्याचा साधा विचारही तिनं कधी केला नसेल.

केसात माळलेल्या गजऱ्यामुळे अभिनेत्रीला मोठा भुर्दंड 

नव्याला मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जेव्हा ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलानं तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांमुळे तिला रोखलं. 15 सेमी लांबीची छोटा गजरा केसाल माळल्यामुळे तिला 1980 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे ₹ 1.25 लाख) चा मोठा दंड भरावा लागला. तिनं स्वतः ओणम उत्सवाच्या मंचावरून ही घटना शेअर केली. नव्यानं सांगितलं की, तिच्या वडिलांनी कोची विमानतळावरून तिच्यासाठी हा गजरा खरेदी केला होता. त्यांनी हा गजरा दोन तुकड्यांमध्ये विभागला.
नव्यानं कोचीहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात गजऱ्याचा एक भाग केसात माळला, पण सिंगापूरला पोहोचेपर्यंत केसात माळलेला तो गजरा सुकला. तिनं दुसरा तुकडा प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवला आणि तो तिच्या हँडबॅगमध्ये ठेवला, जेणेकरून ती सिंगापूर विमानतळावर उतरल्यावर पुन्हा केसाल माळू शकेल. नव्याला माहीत नव्हतं की, अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला फुलं नेणं कायद्याच्या विरोधात आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तिची बॅग तपासली, तेव्हा चमेलीची फुलं पाहून त्यांनी तिला थांबवलं आणि लगेच दंड ठोठावला.

कार्यक्रमात याबाबत बोलताना नव्या म्हणाली की, "मला माहीत आहे की, मी चूक केली, पण ती जाणूनबुजून केलेली नव्हती. मी माझ्या वडिलांच्या सूचनेनुसार ती माळ घेऊन जात होते. त्यांनी मला 28 दिवसांच्या आत दंड भरण्यास सांगितलंय..."

ऑस्ट्रेलियातला नियम काय सांगतो? 

ऑस्ट्रेलियाचा जैव-सुरक्षा कायदा या बाबतीत खूप कडक आहे. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सच्या वेबसाइटनुसार, सरकारी परवानगीशिवाय देशात 'वनस्पती, फुलं आणि बिया' यांसारख्या जैविक पदार्थांना आणण्यास मनाई आहे. कारण या पदार्थांमुळे कीटक, रोग आणि जैविक असंतुलन निर्माण होऊ शकतं. विशेषतः जर त्या फुलांवर आणि बियांवर माती, पानं, बीन्स किंवा देठांचे अवशेष आढळले तर त्यांना धोकादायक म्हणून वर्गीकृत केलं जातं. ही घटना परदेशात प्रवास करताना स्थानिक वस्तू किंवा भावनिक वस्तू सोबत घेऊन जाणाऱ्या सर्वांसाठी एक इशारा आहे. कायद्याच्या अज्ञानामुळे, अशी साधी चूक महागात पडू शकते.

0/Post a Comment/Comments