मराठी अभिनेत्याचा धडकी भरवणारा लूक: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च



मुंबई - चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या नव्या चित्रपटाची सिनेरसिकांना मोठी प्रतिक्षा आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. त्यात अभिनेता सिद्धार्झ जाधव याचा लूक अक्षरशः धडकी भरवणारा आहे.

सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करून त्यातील सिद्धार्थचा लूक समोर आणण्यात आला. या लूकमध्ये सिद्धार्थ जाधव हा आपल्या नेहमीच्या लूकपेक्षा फार वेगळा दिसून येत आहे. चेहऱ्यावर रक्त, जखमांचे व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि नजरेत दडलेले क्रौर्य आदी गोष्टी सिद्धार्थच्या या नव्या लूकमध्ये दिसून येत आहेत. त्याच्या या लूकमुळे त्याची या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका असेल? याविषयी सिनेरसिकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

आपल्या लूकवर काय म्हणतो सिद्धार्थ जाधव?

सिद्धार्थ जाधव आपल्या या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगतो, पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटातील माझी भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधील सर्वात वेगळी आहे. या पात्रात एक वेगळीच क्रूरता आहे. ती त्याच्या लूकमध्ये उतरणे गरजेचे होते. माझ्या लूकचे संपूर्ण श्रेय महेश मांजरेकरांचे आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला. त्यानंतर त्यांनी त्यावर काम करून माझा हा लूक तयार केला. जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नव्हती.

पण माझा महेश मांजरेकरांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे मी सुद्धा या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. सध्या मी या भूमिकेविषयी फार काही बोलू शकत नाही. पण प्रेक्षकांना माझे हे नवे रूप नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.

चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

उल्लेखनीय बाब म्हणजे द ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंटस सत्यसाई फिल्म्स व क्रिझोल्हची निर्मिती असलेला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट झी स्टुडिओच्या माध्यमातून येत्या 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्षमी, सयाजी शिंदे व सिद्धार्थ जाधव यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय त्रिशा ठोसर व भार्गव जगताप हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकारही या चित्रपटात दिसून येणार आहेत.

महेश मांजरेकर यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. राहुल पुराणिक व राहुल सुगंध यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

0/Post a Comment/Comments