अहिल्यानगर - शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीतून जास्त नफ्याचे आमिष दाखवून नगरमधील एका नोकरदाराची तब्बल ३ कोटी ३ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. फसवणुकीची ही घटना २ ऑगस्ट २०२५ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली असून या प्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात ३ जणांसह काही अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सावेडी उपनगरातील रासने नगर मध्ये राहणाऱ्या ६१ वर्षीय नोकरदाराने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शेअर मार्केट बाबत सोशल मिडीयावर माहिती घेत असताना त्यांची साक्षी गुप्ता, जितेन दोषी व विक्रम शहा (पूर्ण नाव व पत्ते माहित नाहीत) यांच्याशी सोशल मिडीयावर ओळख झाली. त्या तिघांनी त्यांना 1999 ENAM MOVING FORWORD तसेच 701 VIP 141 SERVICE GROUP अशा वेगवेगळ्या व्हाटसअप ग्रुप मध्ये घेतले.
त्या ग्रुप वर आरोपी हितेन दोषी व इतरांनी शेअर मार्केट बाबत माहिती देत इतर ग्रुप सदस्यांना किती व कसा नफा झाला, हे पटवून देत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना एक लिंक पाठवून ENAMC हे अॅप त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायला लावले. या अॅप च्या माध्यमातून फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवायला सांगितले. फिर्यादी यांनी २ ऑगस्ट २०२५ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तब्बल ३ कोटी ३ लाख १५ हजार रुपये हे आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यावर पाठविले.
त्यातून शेअर्स आणि आयपीओ खरेदी केल्याचे फिर्यादीस भासविले. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यातून मिळणारा नफा याबाबत आरोपींना विचारणा केली असता नफ्यासह गुंतवलेली रक्कम पाहिजे असल्यास कंपनीला सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल असे म्हणत आणखी पैशांची मागणी केली. ही निव्वळ बनवा बनवी असल्याचे फिर्यादीच्या आले. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी ३ नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
या फिर्यादी वरून पोलिसांनी साक्षी गुप्ता, जितेन दोषी व विक्रम शहा (पूर्ण नाव व पत्ते माहित नाहीत) यांच्यासह इतर अनोळखी आरोपींच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (४), ३१६ (२), ३३६ (२), ३३८, ३३६ (३), ३४० (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. गोंटला हे करत आहेत.
हे ही वाचा ...
नवीन ह्युंदाई व्हेन्यू लाँच; जाणून घ्या किंमत आणि ६५ हून अधिक सेफ्टी फीचर्स!

Post a Comment