अहिल्यानगर - दिवाळी निमित्त बाहेरगावी गेलेल्या सेवानिवृत्त लष्करी सुभेदार यांच्या घरात चोरट्यांनी मोठी चोरी करत सोन्या चांदीचे दागिने, रोकड असा ९ लाख ३९ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३२ या कालावधीत शहरातील बुरूडगाव रोडवरील नक्षत्र लॉंनच्या पाठीमागे घडली आहे.
याबाबत पांडुरंग नागू धोत्रे (वय ६७, रा. नक्षत्र लॉंनच्या पाठीमागे, बुरूडगाव रोड) यांनी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे दोघेच नगरमध्ये राहतात तर त्यांचा मुलगा व सून हे बावधन, पुणे येथे वास्तव्यास आहेत. फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरातील लाईट चालू ठेवून घराला कुलूप लावून त्यांच्या मुलाकडे पुण्याला गेले होते.
२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३२ च्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना फोन करून तुमच्या घरातील लाईट बंद असल्याचे कळविले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना आमच्या घरी जावून पहा लाईट बंद का झाली असे सांगितले. त्यानंतर शेजारील महिला त्यांच्या घरी गेली असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा व कुलूप तुटलेले दिसले. तसेच घरात उचकापाचक झालेली आणि साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. ही बाब त्यांनी फिर्यादी यांना कळविली. ही माहिती मिळाल्यावर फिर्यादी हे पुण्याहून तातडीने नगरला आले आणि त्यांनी घरात जावून पाहणी केली असता त्यांना घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ९ लाख १७ हजार रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व २२ हजारांची रोकड असा ९ लाख ३९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक दिलीप टिपरसे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. संभाजी गायकवाड, स.पो.नि. कुणाल सपकाळे यांच्या सह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी पांडुरंग धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शीतल मुगडे या करत आहेत.
हे ही वाचा ...
नवीन ह्युंदाई व्हेन्यू लाँच; जाणून घ्या किंमत आणि ६५ हून अधिक सेफ्टी फीचर्स!

Post a Comment