मुंबई: बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील 'ही-मॅन' अर्थात अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांचे २४ नोव्हेंबर रोजी दुपारी निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील राहत्या घरी उपचार सुरू होते. याच दरम्यान त्याचे निधन झाले.
धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं त्यांचा मुलगा अभिनेता सनी देओल यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला होता.त्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला होता. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की, त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल होतं. पण, सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला. धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो आहे. धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेलं. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.
३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय
धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी १९६० च्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्यांना ५१ रुपये मानधन देण्यात आले होते. पण त्यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत शोले पासून ते धर्मवीर, मेरा गाव मेरा देश आणि सीता और गीता अशा ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. धर्मेंद्र यांनी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दमदार काम केले होते. त्या चित्रपटात धर्मेंद्र यांनी रणवीर सिंगच्या आजोबांची भूमिका केली होती.
'विजयता फिल्म्स' प्रोडक्शन हाऊस उभारलं
1981 मध्ये, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी 'विजयता फिल्म्स' हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. 'विजयता फिल्म्स'च्या माध्यमातून, धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुलं, सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं. यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली, त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली.
शेवटचा चित्रपट २५ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार
धर्मेंद्र यांचा इक्किस हा सिनेमा त्यांचा अखेरचा ठरला. हा सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे. विषेश म्हणजे उद्याच हा सिनेमा रिलीज होणार होता. पण त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांना शेवटचे स्क्रिनवर पाहता येईल. या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा मुख्य भूमिका साकारत आहे. धर्मेंद्र या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते, त्यांनी सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला होता. "इक्किस" हा सिनेमा येत्या २५ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
धर्मेंद्र यांच्यावर विले पार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात आलेले. धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी देओलने मुखाग्नी दिला आणि तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा बॉलिवूडचा ही-मॅन अनंतात विलिन झाला.
धर्मेंद्र यांनी दोनदा लग्न केले.त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आणि दुसऱ्या पत्नीचे नाव हेमा मालिनी व दोन्ही पत्नींपासून सहा मुले धर्मेंद्र यांना आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना चार मुले - सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल आहेत. त्यानंतर दुसरी पत्नी, हेमा मालिनी, पासून दोन मुली - ईशा देओल आणि अहाना देओल आहेत. याशिवाय धर्मेंद्र यांना १३ नातवंडेही आहेत.

Post a Comment