अहिल्यानगर - केडगाव येथील रुग्णाची प्रकृती अल्सर फुटल्याने गंभीर झाली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये तब्बल वीस लाख रुपये खर्च करूनही ऑपरेशन यशस्वी न झाल्याने, रुग्णावर पुन्हा बारा लाख रुपयांचे ऑपरेशन करावे लागणार असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. अचानक आलेल्या प्रचंड खर्चामुळे नातेवाईक चिंतेत होते.
रुग्णाच्या अत्यावस्थेची माहिती मिळताच नातेवाईकांनी ७ डिसेंबर रोजी खासदार नीलेश लंके यांची भेट घेतली. आर्थिक अडचणीमुळे पुढील उपचार अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थितीची गंभीरता ओळखत खासदार लंके यांनी लगेच मदतीचा शब्द दिला.
रुग्णाला तत्काळ शासकीय मदत मिळावी म्हणून खासदार लंके यांनी ताबडतोब ससून हॉस्पिटल, पुणे येथील वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. किरण जाधव यांच्याशी संपर्क साधला. रुग्णाला कोणताही खर्च न आकारता उपचार करण्याची विनंती त्यांनी केली. डॉक्टरांनीही समाजकर्तृत्व जपत ही विनंती मान्य केली.
९ डिसेंबर रोजी रुग्णावर ससून हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी ठरून रुग्ण आता धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त करत खासदार लंके यांचे आभार मानले.
सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण
आरोग्यसेवेतील प्रचंड खर्चामुळे अनेक कुटुंबे अडचणीत येतात. अशा वेळी जनप्रतिनिधींनी तत्परतेने उभे राहून मदत करणे ही समाजकारणाची खरी व्याख्या असल्याचे निरीक्षण स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. खासदार नीलेश लंके यांनी दिलेली मदत ही संवेदनशीलता, वेगवान निर्णयक्षमता आणि लोकप्रतिनिधी म्हणून निभावलेली जबाबदारी याचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.

Post a Comment