पारनेर - पारनेर तालुक्यातील किन्ही येथे २ डिसेंबर रोजी स्व.भागुबाई विश्वनाथ खोडदे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात ठिकठिकाणी लावलेल्या १० पिंजऱ्यापैकी एका पिंजऱ्यात एक बिबट्या ९ डिसेंबर रोजी रात्री जेरबंद झाला आहे. विशेष म्हणजे दुपारी पिंजरा लावला आणि रात्री बिबट्या त्यात अलगदपणे अडकला आहे.
महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही वनविभागाच्या वतीने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने किन्ही - बहिरोबावाडी येथील नागरिकांनी ८ डिसेंबर रोजी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण - नगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत तातडीने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील असे लेखी आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने ८ व ९ डिसेंबर रोजी दहा पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले होते.
सदरचे पिंजरे ठिकठिकाणी लावण्यात येत असतानाच ९ डिसेंबर रोजी कारभारी खोडदे यांच्या शेळीवर बिबट्याने झडप मारून शेळी उचलून नेली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली, परंतु बिबट्या आढळला नाही परंतु शेळीचे अर्धवट शरीर ओढ्यामध्ये आढळून आले होते. मग हाडकीचा तलाव परिसरात पिंजरा लावून त्या पिंजऱ्यात अर्धवट खाल्लेली शेळी ठेवण्यात आली. सायंकाळी बिबट्या अर्धवट खाल्लेल्या शेळीच्या शोधार्थ आला असता अलगदपणे पिंजऱ्यामध्ये अडकला अशा प्रकारे ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पहिला बिबट ( नर ) पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले आहे. पकडलेला बिबट्या राञी उशिरा सुरक्षितरित्या पारनेर येथे नेण्यात आला.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक उपवनसंरक्षक अश्विनी दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे, अजिंक्य भांबुरकर, एस.एन.भालेकर, कानिफनाथ साबळे, वनरक्षक निलेश बडे, एम.वाय.शेख, एफ.एस.शेख, बी.एस.दवने, ए.ए.जाधव, एस.के.कार्ले, ए.बी.पठाण, सर्व पारनेर रेंजचे कर्मचारी, टाकळी ढोकेश्वरचे पथक, संगमनेरचे पथक, किन्ही येथील ग्रामस्थ, युवक अभिजित खोडदे, दिलीप खोडदे, सुनिल खोडदे, किरण पवार, आदेश परांडे, नितीन खोडदे, संग्राम खोडदे, जयसिंग खोडदे, विनोद खोडदे, प्रसाद खोडदे, तेजस मुळे, विनोद खोडदे, गोरक्ष खोडदे, वैभव गिरी, प्रथमेश घोडके, यश घुले, सुरज खोडदे, सुभाष किनकर, विठ्ठल खोडदे आदींनी संयुक्तपणे सदर रेस्क्यू आँपरेशन यशस्वी केले.
पकडलेला बिबट नरभक्षक असेल तर त्यास ठार करावे
किन्ही येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले तरी या भागात अजूनही बिबटे आहेत.तसेच पकडलेला बिबट्या नरभक्षक असेल तर त्यास ठार करावे किंवा अभयारण्यात हलवावे परंतु जंगलात व इतरञ सोडून देऊ नये तसेच उर्वरित बिबट्यांना देखील लवकर जेरबंद करून किन्ही , बहिरोबावाडी ,करंदी, पिंपळगाव तुर्क हि गावं बिबटमुक्त करावीत. अशी मागणी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी केली आहे.

Post a Comment