नगरमध्ये पोलिसांचा थरारक पाठलाग अन् अपहरण करणारे दोघे झाले जेरबंद


अहिल्यानगर - वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथुन जेष्ठ नागरिकाचे अपहरण करुन आणि रस्त्यात कारचालकाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने थरारक पाठलाग नगर मनमाड महामार्गावर कॉटेज कॉर्नर जवळ त्यांना पकडले आहे. राहुल दिलीप म्हस्के (वय ३२, रा. जालना), सतिष उर्फ बालु विनायक जाधव (वय २९, रा. जालना) अशी पकडलेल्या दोघांची नावे असून त्यांच्या ताब्यातून सिताराम नारायण खानजोडे (वय ६०,रा. आसेगांव, पेन, जि. वाशिम) या अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे.  

याबाबतची माहिती अशी की, या दोघा आरोपींनी खानजोडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहून लग्न ठरवले व लग्नाचा बनाव करून त्यांची फसवणूक केली. हा बनाव उघडकीस आल्यानंतर फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादीचे वडिल सिताराम खानजोडे यांचे अपहरण करुन घेवुन गेले होते. त्यानंतर आरोपी हे अपहरित इसमास घेवुन जात असतांना त्यांनी पुन्हा मापे गावाचे शिवार (ता. रिसोड, जि. वाशिम) या ठिकाणी अंकुश मोहन राठोड (रा. बोरगडी, तांडा, ता. हिमायतनगर, जि. नांदेड) हे त्यांचे मित्रासह दवाखान्यामध्ये जात असतांना त्यांची गाडी अडवुन व गाडीची काच फोडुन राठोड यांना मारहान करुन २२ हजार रुपये रोख रक्कम जिवे मारण्याची धमकी देवुन दरोडा टाकुन घेवुन गेले. सदर दोन्ही घटनांबाबत रिसोड पोलीस स्टेशन येथे फसवणूक, अपहरण व दरोडा असे गुन्हे दाखल झालेले आहेत.

सदर आरोपी हे छत्रपती संभाजी नगर मार्गे अहिल्यानगरच्या दिशेने गेल्याची माहिती वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नगरचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना देवुन गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेणेबाबत कळविले. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देवून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पो.नि. किरणकुमार कबाडी, स.पो.नि.हरिष भोये, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, गणेश धोत्रे, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सतिष भवर, योगेश कर्डीले, बाळासाहेब खेडकर, उमाकांत गावडे यांचे पथक शेंडी बायपास चौकात नाकाबंदीसाठी गेले.

शेंडी बायपास परिसरामध्ये नाकाबंदी करत असतांना छत्रपती संभाजीनगर कडुन अहिल्यानगर चे दिशेने एक कार भरधाव वेगात येतांना दिसली. पथकाने पोलीस वाहने रोडला आडवी लावुन संशयीत कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता संशयीत कार चालकाने त्याचे ताब्यातील कार भरधाव वेगामध्ये एम.आय.डी.सी. कडे निघुन गेला. त्यामुळे पथकाने त्यांचा पाठलाग सुरु केला तसेच एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे स.पो.नि.माणिक चौधरी, पोलीस अंमलदार सतिष खामकर, सुरेश देशमुख, अक्षय रोहोकले यांना माहिती कळवुन संशयीत कार थांबविणेबाबत सुचना दिल्या. पथक सदर कारचा पाठलाग करत असतांना संशयीत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याचे ताब्यातील कार कॉटेज कॉर्नर या ठिकाणी डिव्हायडर वर गेल्याने कार बंद पडली. त्यावेळी कारमधील इसमांना ताब्यात घेण्यात आले. व दोघा गुन्हेगारांच्या तावडीतून सिताराम खानजोडे यांची सुटका करण्यात आली. या आरोपींना रिसोड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. 


 

0/Post a Comment/Comments