नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील मठपिंप्री (ता. नगर) येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ७.७८ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. दोबोले वस्ती व कळमकर वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यांची दीर्घकालीन मागणी होती. या मागणीला प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला प्रतिसाद देत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी निधी मंजूर करून या कामास गती दिली.
भूमिपूजन प्रसंगी ज्येष्ठ नेते संपत म्हस्के, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीपराव लाळगे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब दरंदले, संजय बोरकर, संतोष कळमकर, बाळासाहेब कळमकर, आकाश नवसुपे, रामदास बोरकर, सुनिल कळमकर, दिपक नवसुपे, हौसराव नवसुपे, लक्ष्मण दोबोले, सुभाष दोबोले, जनार्दन चौधरी, सागर नवसुपे, दिलीप नवसुपे यांच्यासह मठपिंप्री, हातवळण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मठपिंप्री गावांतर्गत सुमारे ९ किलोमीटर लांबीचा हा रस्ता मजबूत डांबरीकरणाने विकसित करण्यात येणार असून, अंतर्गत दळणवळण सुलभ होणार आहे. नगर तालुक्यातील इतरही अनेक ग्रामीण रस्त्यांना मंजुरी मिळाली असून, त्यांची भूमिपूजने लवकरच केली जातील, असे खा. लंके यांनी यावेळी स्पष्ट केले.
आष्टी व नगर तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून या मार्गाकडे पाहिले जाते. कामाच्या दरम्यान या रस्त्यावर मोठ्या पुलाची गरज ग्रामस्थांनी मांडली. खा. लंके यांनी अधिकाऱ्यांसह ट्रायल पीट द्वारे सर्वेक्षण केले आहे. पुलाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून, हे कामही लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘बाळासाहेब हराळ शब्द पाळणारे नेतृत्व’- खा.लंके
कार्यक्रमात बोलताना खा. निलेश लंके यांनी बाळासाहेब हराळ यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. “जनतेशी जोडलेले नेतृत्व म्हणून हराळ यांनी समाजकारण केंद्रस्थानी ठेवत अनेक प्रश्न सोडवले आहेत. शब्द पाळणारा नेता अशी त्यांची प्रतिमा असून, त्यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
Post a Comment