अहिल्यानगर - ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी एल अॅण्ड टी फायनान्स कंपनी कडून ६५ जणांनी सुमारे ४ कोटी ३ लाख ४० हजार ४७५ रुपयांचे कर्ज घेतले. या कर्ज रकमेतून ट्रॅक्टरही खरेदी केले, मात्र गेल्या दीड दोन वर्षात यातील एकाही कर्जदाराने एकही कर्जाचा हप्ता भरला नाही. कंपनीने केलेल्या चौकशीत कंपनीच्या ४ सेल्स एक्झिक्युटिव्ह यांनी या कर्जदारांशी संगनमत करून त्यांचे बोगस पत्ते व इतर बोगस कागदपत्रांच्या फाईल बनवून त्या खऱ्या आहेत असे भासवून ही कर्ज प्रकरणे मंजूर करत हा मोठा घोटाळा केल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीने ४ कर्मचाऱ्यांसह ६५ कर्जदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एल अॅण्ड टी फायनान्स कंपनीचे पुणे झोनल सेल्स मॅनेजर योगेश छगन सूर्यवंशी (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे) यांनी १७ डिसेंबर रोजी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी नुसार कंपनीचे नगर जिल्ह्यात काम करणारे सेल्स एक्झिक्युटिव्ह हर्षल गोकुळ सालबांडे (रा.बेलापूर, ता.श्रीरामपूर), खंडेराव सिमाजी रक्ताटे (रा. लोणी, ता.आष्टी, जि.बीड), अक्षय चंद्रकांत कराळे (रा.कामत शिंगवे, ता. पाथर्डी), राहुल गणपत कांडेकर (रा. हमिद्पूर, हिंगणगाव, ता.नगर) यांच्या सह ६५ कर्जदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व कर्जदार राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, पारनेर सह विविध तालुक्यातील आहेत.
नगर जिल्ह्यात विविध ठिकाणच्या शो रूम मध्ये कार्यरत असलेल्या या ४ सेल्स एक्झिक्युटिव्ह यांनी ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत या ६५ कर्जदार यांचे कागदपत्रे घेवून, त्यांची चौकशी करून त्यांच्या कर्जाच्या फाईल कंपनीकडे मंजुरी साठी पाठविल्या होत्या. या फाईल नुसार कंपनीने एकूण ४ कोटी ३ लाख ४० हजार ४७५ रुपयांचे कर्ज वितरीत केले. त्यातून या कर्जदारांनी विविध शो रूम मधून विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर खरेदी केले. त्यानंतर त्यांच्या कर्जाचा पहिला हप्ता बँक खात्यातून ऑटो डेबीट होणे आवश्यक होते, पण तो झाला नाही. तसेच कर्जदारांनी वेळेत हप्तेही भरले नाहीत. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी संबंधित पत्यांवर जावून कर्जदारांना कर्ज हप्त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
बऱ्याच कर्जदारांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत, तसेच त्यांच्या बँक खात्यातून ऑटो डेबीट ही झाले नाहीत. त्यामुळे कंपनीचे एरिया मॅनेजर आनंद पैठणे यांनी सखोल चौकशी केली असता सदर कर्जदार आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह यांनी संगनमत करून कर्जदार ज्या घरात राहात नाहीत त्या घरासमोर उभे राहून त्यांचे फोटो काढून राहण्याचे पत्ते खोटे सांगून ४ कोटी ३ लाख ४० हजार ४७५ रुपयांचे कर्ज घेतले व त्या कर्जाची व्याजासह रक्कम ४ कोटी ८२ लाख ७७ हजार ६२५ रुपये अद्यापपर्यंत न भरता एल अॅण्ड टी फायनान्स कंपनीची फसवणूक केली.
असा चौकशी अहवाल एरिया मॅनेजर आनंद पैठणे यांनी दिल्यानंतर कंपनीचे पुणे झोनल सेल्स मॅनेजर योगेश सूर्यवंशी यांनी १७ डिसेंबर रोजी राहुरी पोलिस ठाण्यात ४ सेल्स एक्झिक्युटिव्ह व ६५ कर्जदार अशा ६९ जणांच्या विरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी या सर्वांच्या विरुद्ध बीएनएस ३(५), ३१६ (५), ३१८ (४), ३३५, ३३६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. सुदाम शिरसाठ हे करत आहेत.

Post a Comment