नगर तालुक्यातून सैराट झालेल्या अल्पवयीन मुलीला व तरुणाला गोव्यात पकडले



नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील मठपिंप्री गावातून १४ नोव्हेंबर रोजी लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला व आरोपीला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने गोव्यात पकडले आहे. प्रतिक संजय मुरुमकर (वय २३, रा.कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर मुलीच्या जबाबावरुन अत्याचाराच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

आरोपी प्रतिक याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून १४ नोव्हेंबर रोजी रात्री महिंद्र झायलो गाडीतून पळवून नेले होते. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मुलीचा शोध घेण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी आंदोलनही केले होते. या मुलीचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी सपोनि. प्रल्हाद गिते यांनी पोहेकॉ. आबासाहेब झावरे, नितीन शिंदे, राजू खेडकर, सचिन म्हस्के यांचे पथक नियुक्त केले होते. या पथकाने तसेच मोबाईल सेल दक्षिण विभागाचे पोकॉ. राहुल गुंडू यांनी तांत्रिक तपासातून सदर आरोपी हा गोवा येथे असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पथकाने गोवा येथे जावून आरोपी व मुलीला ताब्यात घेतले.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपीची चतुराई

आरोपी प्रतिक मुरुमकर याने सदर मुलीला पळवून नेताना अतिशय चतुराई दाखवली. गाडीत बसताच मोबाईल बंद केले. तो मुलीला घेवून प्रथम राहुरी येथे गेला. तेथे त्याने गुन्ह्यात वापरलेली गाडी टोलनाक्यावरील कॅमेर्‍यात दिसून आपण पकडले जावू म्हणून सदर गाडी राहुरी येथे नातेवाईकांकडेच लावली. नंतर तेथून खासगी ट्रॅव्हल्स्ने प्रथम कोल्हापूर व नंतर गोवा येथे गेला. गोव्यात मित्राच्या मदतीने नावेली परिसरातील भाड्याने खोली घेवून तो राहत होता. त्यामुळे त्याचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. 

मात्र अवघ्या १० सेकंदासाठी त्याने एका व्यक्तीचे घेतलेले मोबाईलचे हॉटस्पॉट त्याला महागात पडले आणि त्याचे लोकेशन पोलिसांना ट्रेस झाले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मुलीने दिलेल्या जबाबावरुन बीएनएस ६४ प्रमाणे अत्याचाराचे वाढीव कलम लावले असून, त्याला १२ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.




0/Post a Comment/Comments