बापरे ... सुप्यात भरदिवसा घर फोडले, तब्बल १७ तोळे सोने चोरट्यांनी पळविले



पारनेर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सुपा येथे भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 17 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे सुपा गावात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून थांबलेले चोर्‍यांचे सत्र पुन्हा सुरू होते की काय, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (दि.1) सकाळी 11 ते दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास चोरीची ही घटना घडली. याबाबत शायदा हसन शेख (वय 35, मूळ रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुप्यातील शहाजापूर रोडवरील पारनेर तालुका सहकारी दूध संघाच्या पाठीमागील अपार्टमेंटमध्ये शेख यांचे घर आहे. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेख या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या.

ही संधी साधून चोरट्यांनी घराचे व तिजोरीचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यात 6 तोळ्याचे सोन्याचे गंठण (तीन लाख रुपये), चार तोळ्याचा राणीहार (2 लाख), 2 तोळ्याचे ब्रेसलेट (1 लाख), अडीच तोळ्याचे कानातले बेलचे (दीड लाख), दीड तोळ्याच्या अंगठ्या (75 हजार), कानातील 3 जोड (50 हजार), असे एकूण 8 लाख 75 हजार रुपयांचे एकूण 17 तोळे सोने चोरांनी लंपास केले.

दरम्यान, चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकास पाचारण करण्यात आले; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस चोरांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एन. खैरे करीत आहेत. सुपा-शहाजापूर रोडलगत भरदिवसा चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



 

0/Post a Comment/Comments