नगरसह २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर, १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी



अहिल्यानगर - अहिल्यानगरसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक जाहीर झाली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी १५ डिसेंबर रोजी दुपारी हा निवडणूक कार्यक्रम पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केला. 

या २९ महापालिकांध्ये आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे. दाखल अर्जांची छानणी ३१ डिसेंबर रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. ३ जानेवारीला निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. १५ जानेवारीला म तदान घेण्यात येणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी होवून निकाल घोषित केला जाणार आहे. विविध राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन भरण्यात येणार आहेत.

अ वर्ग महापालिकांसाठी उमेदवारांसाठी प्रचार खर्चाची मर्यादा १५ लाख, ब वर्ग महापालिकेसाठी १३ लाख, क वर्ग महापालिकेसाठी ११ लाख तर ड वर्ग महापालिकेसाठी ९ लाख असणार आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची विधानसभेची मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत असेल. त्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित नगरसेवकाचे पद रद्द होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. 

अहिल्यानगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेनेने २४, भाजपने १४, काँग्रेसने ५, तर राष्ट्रवादीने १८ आणि बसपा ने ४ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय समाजवादी पक्षाने १ तसेच २ जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या होत्या. या नगरसेवकांचा कार्यकाळ डिसेंबर २०२३ मध्ये संपला. सर्वोच्च न्यायालयात दाखल ओबीसी आरक्षण याचिकांमुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे डिसेंबर २०२३ पासून अहिल्यानगर महापालिकेवर प्रशासक नियुक्त आहे. तब्बल ७ वर्षांच्या कालखंडा नंतर या निवडणुका होत असल्याने निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍यांची संख्या मोठी आहे. निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते ही शक्यता गृहीत धरून प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु आहे. एकूण १७ प्रभागातून ६८ नगरसेवक निवडले जाणार आहेत.

0/Post a Comment/Comments