नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची अचानक माघार; पाथर्डीत भाजपच्या खेळीमुळे अजित पवार गटाला धक्का



पाथर्डी - पाथर्डी पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आज, बुधवारी अखेरच्या दिवशी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत यांनी अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने खळबळ उडाली आहे. पक्षश्रेष्ठी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच भागवत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यात पाथर्डीसह कोपरगाव, देवळाली प्रवरा व नेवासा या चार नगरपालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या होत्या. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापासून थांबलेल्या निवडणुका पुढील टप्प्यावर पुन्हा सुरू झाल्या. चारपैकी पाथर्डी निवडणुकीत मोठी घडामोड घडली.

संजय भागवत यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजप आमदार मोनिका राजळे व भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड यांचे डावपेच यशस्वी ठरल्याचे मानले जाते. भाजपच्या खेळीमुळे अजित पवार गटाला मोठाच धक्का बसला आहे. भागवत यांच्या माघारीमुळे अजित पवार गटाच्या नगरसेवक पदाच्या निवडणूक रिंगणातील २० उमेदवारांना आपण नगराध्यक्ष पदासाठी नेमकी कोणाला मते मागायची असा प्रश्न पडला आहे.

दरम्यान भागवत यांना पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार गटाने एबी फॉर्मवर नाव टाकलेले राहुल ढाकणे यांचा उमेदवारी अर्ज यापूर्वीच झालेल्या छाननीत‌ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला ढाकणे यांच्या उमेदवारी अर्जाला ५ सूचक नसल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व डॉ. उद्धव नाईक यांनी दिले होते. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उमेदवारचं नसल्याने अजित पवार गटाची मोठीच गोची झाली आहे. ढाकणे यांचा अर्ज बाद केल्याच्या मुद्यावरून आता अजित पवार गटाने  न्यायालयात जाण्याची तयारी केल्याने ही निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पाथर्डीत अजित पवार गट अस्तित्वहिन झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथर्डीतील शिवाजीराव गर्जे यांना विधानपरिषदेवर संधी दिल्यानंतर गर्जे यांनी पालिका निवडणुकीत सर्वच जागांवर उमेदवार उभे करत पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पाथर्डी शहरात कोष्टी समाजाची मते लक्षणीय असल्याने भागवत यांना उमेदवारी दिली होती, मात्र भागवत हे आपल्या गळाला लावू शकतात, हे आमदार राजळे व भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड यांनी अगोदरच हेरले होते. निवडणूक पुढे ढकलली जाताच राजळे व आव्हाड यांनी भागवत यांच्याशी संपर्क करत त्यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास प्रवृत्त केल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना कल्पना न देताच भागवत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याचा फायदा भाजपला कसा होतो याकडे लक्ष राहणार आहे.



0/Post a Comment/Comments