प्रशिक्षणार्थी लष्करी जवानाच्या मृत्यू प्रकरणी आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा



अहिल्यानगर – लष्करी प्रशिक्षण घेत असलेल्या जवानास कारने धडक देवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. कल्याण किसनराव लवांडे (वय ३१, तिसगाव, देशमुख मळा, ता.पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. येथील जिल्हा व अतिरक्त सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हा निकाल दिला आहे.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, १३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास नगर पाथर्डी रोड बारा बाभळी, प्रियदर्शनी स्कूल जवळ मिल्ट्री ट्रेनिंगच्या मुलांची क्रॉस कंट्री रेस सुरू होती. त्यावेळी पाथर्डी कडून येणारी वाहतूक थांबवली असतानाही आरोपी याने त्याची इंडिगो कार (क्र.एमएच १६ एटी ३९९१) या गाडीने फिर्यादी यांनी थांबण्याचा इशारा केला असतानाही सदरची कार ही भरधाव वेगाने पुढे आणून क्रॉस कंट्री रोड ओलांडित असलेला जवान नितीन कुमार महेश चंद (वय २०) याला कारची जोराची धडक देउन काही अंतरापर्यंत फरपटत नेउन अपघात केला. सदर अपघातामध्ये मयतास डोक्यास व शरीरावर इतर ठिकाणी जोरदार मार लागला व तो रोडवरच बेशुध्द पडला. कार डायव्हर हा मयतास जोराची धडक देउन जागेवरून पळून गेला. नितीन कुमार याला मिल्ट्री हॉस्पिटल येथे नेले असता त्याला मयत घोषित करण्यात आले.

या प्रकरणी लष्करी अधिकारी उत्पल बर्मन यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३०४ प्रमाणे व मोटार वाहन कायदा १३४ अ) (ब) व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या प्रकरणात न्यायालयामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी साक्षीदार क्रमांक २ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्याची साक्ष सदरच्या प्रकरणामध्ये महत्त्वाचे मानली गेली व भा.द.वि. कलम ३०४ व व मोटार वाहन कायदा १३४ (अ) (ब) व १७७ प्रमाणे दोषी धरण्यात आले.वरील प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष तसेच मा. न्यायालयाचे रेकॉर्डवर असणारा कागदोपत्री पुरावा महत्त्वाचा मानण्यात आला. सदर प्रकरणात आरोपीला दोषी धरून न्यायालयाने सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी भा.द. वि. कलम ३०४ प्रमाणे ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २हजाररुपये दंड व मोटार वाहन कायदा १३४ (अ) (ब) व १७७ प्रमाणे ५०० रुपये दंड ठोठावला.

या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती. व्ही. आर. राउत यांनी काम पाहिले. सदरच्या प्रकरणातील तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक जयश्री काळे तसेच त्यांना पैरवी अधिकारी, उपनिरीक्षक एम.ए. जोशी व सहा. फौजदार. एस.आर. पठारे व पो.हे.कॉ. ए.बी. चव्हाण यांनी खटल्यामधील साक्षीपुरावे नोंदविताना सहाय्य केले.



0/Post a Comment/Comments