नगर तालुका (प्रतिनिधी) - पोस्ट ऑफिसमधील फिक्स डिपॉझिट व विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतील, असे आमिष दाखवून कामरगाव (ता. नगर) येथील शेतकर्यासह गावातील ४० ते ५० नागरिकांची ९ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुखदेव दगडू ठोकळ (वय ५३, रा. कामरगाव, ता.नगर) यांनी
पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बबन साहेबराव शेलार (मुळ रा. गुंफा, भातकुडगाव,
ता. शेवगाव, सध्या रा. फत्तेपुर, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बबन शेलार
याने ६जुलै २०२४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत कामरगाव पोस्ट ऑफिस येथे फिर्यादी
सुखदेव ठोकळ व इतर नागरिकांचा विश्वास संपादन केला.
शेलार याने पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये
फिक्स डिपॉझिट व इतर योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट होईल, असे
सांगून फिर्यादी व इतरांकडून ९ लाख रूपये घेतले. मात्र या रकमेच्या बदल्यात बनावट
नोंदी करून विश्वासघात केला व आर्थिक फसवणूक केली, असे
फिर्यादीत नमूद आहे. सदर प्रकरणाची माहिती ठोकळ यांनी नगर तालुका पोलिसांना दिली.
पोलिसांनी २८ जानेवारी रोजी सायंकाळी बबन शेलार याच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१६
(५), ३१८ (४), ३४४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश
पतंगे करीत आहेत.
दरम्यान, संशयित आरोपीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता अधिकृत शासकीय योजनांची खातरजमा करूनच गुंतवणूक करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment