मुंबई - राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक
निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने हालचाली गतिमान
केल्या आहेत. अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा
पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आणि उपमुख्यमंत्रिपद सोपवण्याबाबत पक्षात एकमत
होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या शनिवारी
पक्षाच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी
काँग्रेसच्या वतीने विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांना शनिवारी
मुंबईतील पक्ष कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजित पवार
यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आगामी
निवडणुका आणि सरकारमधील सहभाग पाहता नवीन नेतृत्वाची निवड करणे अनिवार्य झाले आहे.
उद्याच्या बैठकीत या महत्त्वाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता
आहे.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्याच्या
बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाऊ शकते. सध्या त्या
राज्यसभा खासदार आहेत, मात्र अजितदादांच्या रिक्त झालेल्या
बारामती विधानसभा मतदारसंघातून त्या आगामी काळात निवडणूक लढवू शकतात. त्यांच्याकडे
राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सोपवण्याबाबतही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे.
पक्ष कार्यालयातील बैठकीनंतर सर्व ज्येष्ठ नेते सुनेत्रा पवार यांची भेट
घेण्यासाठी बारामतीला रवाना होणार आहेत.
या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादीचे
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “सुनेत्रा पवार यांनाच
विधिमंडळ नेते करावे, अशी पक्षातल्या नेत्यांची भावना आहे.
यासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली असून, उद्या स्वतः
सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल,” असे भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर
राष्ट्रवादीचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, या प्रश्नाने
राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती. मात्र, पक्षाने आता स्पष्ट
संकेत दिले आहेत की, ही दोन्ही पदे पवार कुटुंबाकडेच राहतील. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीमुळे
कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक संदेश जाईल आणि पक्ष एकसंध राहील, असा विश्वास
नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Post a Comment