नगरजवळ महामार्गावर भररस्त्यात ट्रक अडवून ९.६७ लाखांच्या गव्हाच्या पोत्यांची लूट



नगर तालुका (प्रतिनिधी) - मध्यप्रदेशातून सोलापूरच्या दिशेने गहू घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अहिल्यानगरजवळील देहरे टोल नाक्यावर अडवून चार अनोळखी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत ट्रक चालकाचे हातपाय बांधून ट्रकमधील तब्बल ९ लाख ६७ हजार २०० रुपये किमतीचा गहू लंपास केला आहे.२७ जानेवारी रोजी रात्री ही लुटीची घटना घडली आहे.

याप्रकरणी जगदीश चतुर्भुज माळी (वय ५५, रा. लहुजा, जि. मंदसौर, मध्यप्रदेश) यांनी २८ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगदीश माळी हे त्यांच्या ट्रकमध्ये गव्हाचे कट्टे भरून सोलापूरकडे निघाले होते. २७ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास देहरे टोल नाक्याजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांचा १२ टायर ट्रक माळी यांच्या ट्रकसमोर आडवा लावला. त्यानंतर चोरट्यांनी माळी यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि त्यांचे हातपाय बांधून टाकले. चोरट्यांनी माळी यांच्या ट्रकमधील ७ लाख ९९ हजार २०० रुपये किमतीचे ८३३ कट्टे आणि १ लाख ६८ हजार रुपये किमतीचे १२० कट्टे असा एकूण ९ लाख ६७ हजार २०० रुपयांचा गहू स्वतःच्या ट्रकमध्ये भरून पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भररस्त्यात झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



0/Post a Comment/Comments