फोन पे वर ऑनलाईन पैसे पाठविल्याचा बनाव करून ५० हजारांची रोकड घेवून झाला पसार

 


अहिल्यानगर - शहरातील वाडिया पार्क परिसरातील एका मोबाईल शॉपीमध्ये ऐन दुपारी फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रोख रक्कम घेऊन त्याबदल्यात बनावट ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन पैसे पाठवल्याचे भासवून एका भामट्याने तरुणाची ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील रहिवासी आणि मोबाईल व्यावसायिक सर्फराज मुक्तार सय्यद हे आपल्या मित्रासह अहिल्यानगरमध्ये मालाची खरेदी करण्यासाठी आले होते. वाडिया पार्क परिसरातील केडीएम मोबाईल शॉपीमध्ये साहित्य पाहत असताना आरोपी अनिकेत पठारे (रा. मावळेवाडी) याने त्यांच्याशी संपर्क साधला. "मला रोख रकमेची गरज आहे, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो," असे सांगून आरोपीने सर्फराज यांचा विश्वास संपादन केला. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने ५० हजार रुपये रोख अनिकेतच्या हवाली केले

पैसे घेतल्यावर आरोपीने मोबाईलवर व्यवहार यशस्वी झाल्याचा बनावट संदेश दाखवला आणि तेथून पसार झाला. मात्र, बराच वेळ होऊनही खात्यात पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सर्फराज यांच्या लक्षात आले. शहरात शोध घेऊनही आरोपी सापडला नाही. अखेर या फसवणुकीबाबत सर्फराज सय्यद यांनी आरोपी अनिकेत पठारे विरुद्ध कोतवाली पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम ३१८ (), ३१६ () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

0/Post a Comment/Comments