वाळकी येथे उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, हाताचे बोट मोडले


नगर तालुका (प्रतिनिधी) - उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून एका तरुणाला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास नगर तालुक्यातील वाळकी येथे घडली. या मारहाणीत फिर्यादी तरुणाच्या हाताचे बोट मोडले असून, झटापटीत सोन्याची अंगठी गहाळ झाली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लक्ष्मण अनिल कासार (वय २४, रा. वाळकी, ता.नगर) याने फिर्याद दिली आहे. लक्ष्मण याने सोनु उर्फ अशोक गुंड (रा. वाळकी) याला काही पैसे उसने दिले होते. वाळकी बसस्थानकाजवळील शिवगॅरेजसमोर लक्ष्मणने हे पैसे परत मागितले. याचा राग आल्याने आरोपी सोनु याने लक्ष्मणला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने लक्ष्मणच्या डाव्या हाताची करंगळी पकडून ती जोरात पिरगळली, ज्यामुळे ती मोडून गंभीर दुखापत झाली.

इतक्यावरच न थांबता आरोपीने लाकडी काठीने लक्ष्मणच्या पाठीवर प्रहार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या गोंधळात फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी कोठेतरी पडून गहाळ झाली आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेत लक्ष्मणने दवाखान्यात उपचार घेतले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून नगर तालुका पोलिसांनी आरोपी सोनु उर्फ अशोक गुंड याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार लाड करत आहेत.

0/Post a Comment/Comments