अहिल्यानगर - एमआयडीसी येथे कंपनीच्या उद्योजकांना खंडणीसाठी धमकावत मॅनेजर कडून दमदाटी करत २० हजार रुपये बळजबरीने घेणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
एम.आय.डी.सी प्लॉट नं. ०७ व ०८ येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर ४ अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद करण्यास लावले. काम चालु करायेच असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु असे म्हणुन खंडणी मागुन मॅनेजर प्रकाश कोकाटे यांचेकडुन दमदाटी करुन २० हजार रुपयांची खंडणी घेतली. तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलवुन त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली होती.
त्यानंतर एम.आय.डी.सी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची प्रत्यक्ष भेट घेवुन संबंधीत इसमाविरुध्द कारवाई करणे बाबत निवेदन दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपा येथील दौऱ्यात एमआयडीसी मधील कंपनीचे उद्योजकांना कोणी त्रास देत असले, तर त्यांना कायद्याने ठोकुन काढा " अशी सुचना दिली होती.
त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी निंबळक एम.आय.डी.सी. येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि.या कंपनीकडुन दमदाटी करुन खंडणी घेतलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर ४ अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत आदेश दिल्याने वरील आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (५), ३०८ (४), ३२९ (४), १८९ (२), १९१ (२), १९०, ३२५, ३५१ (२), ३२४(३) प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे. त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याला ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.
उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व एम.आय.डी.सी मधील सर्व कंपनी उद्योजक व कामगारांना सुचित करण्यात येते की, जो कोणी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजक व कामगारांना त्रास देईल, अशा इसमांविरुध्द तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दयावी. कंपनी उद्योजकांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई करुन कंपनी उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल. असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Post a Comment