अहिल्यानगर - शहरातील विळद बायपास जवळील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका ७५ वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बापू नामदेव शिंदे (वय ७५, रा. नवनागापूर, अहिल्यानगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा मोहन बापू शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बापू शिंदे यांचा मृतदेह विळद बायपास जवळील साईबन समोरील एका मोकळ्या पटांगणात आढळून आला. अज्ञात आरोपीने कोणत्याही कारणावरून बापू शिंदे यांच्या डोक्यावर बोथट किंवा तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखम करून त्यांचा जीव घेतला.
ही घटना १३ फेब्रुवारीच्या दुपारी २ ते १४ फेब्रुवारीच्या रात्री १०.४५ दरम्यान घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. माणिक चौधरी आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या या खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. एमआयडीसी पोलिसांनी कलम १०३ (१) भारतीय न्याय संहितेनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही कार्यान्वित झाले आहे.
मयत बापू शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कैलास शिंदे यांचे ते वडील होत. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या राजकीय द्वेषातून झाली की इतर काही कारणासाठी झाली. याबाबत शहरात चर्चा सुरु झालेली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी त्वरित तपास लावा, अशी मागणी नागापूर ग्रामस्थांमधून होत आहे.

Post a Comment