शिक्षकी पेशाला काळीमा...शिक्षकाकडून इयत्ता दुसरीतील ४ विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन

 


श्रीरामपूर - शहरातील एका प्रतिष्ठित प्राथमिक शाळेत एका शिक्षकानेच आठ वर्षीय चार चिमुकलींशी असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षकाला तत्काळ अटक केली आहे.

श्रीरामपूर शहरातील एका नामांकीत प्राथमिक शाळेतील शिक्षक सचिन महाजन गोणारकर (वय ३५, रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, . मु. मोरगे वस्ती, वॉर्ड क्र. , श्रीरामपूर) या शिक्षकाची १ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे संबंधित शाळेवर नियुक्ती करण्यात आली होती. या शिक्षकाने तो शिकवत असलेल्या वर्गातील इयत्ता दुसरीतील चार विद्यार्थिनींशी केलेल्या असभ्य वर्तनाची वाच्यता संबंधित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांकडे केली. याचा जाब विचारण्यासाठी पालकांनी शाळा गाठली, त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन सदर प्रकार कानावर घातला.

शहर पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत गोणारकर या शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. संबंधित शिक्षक आणि विद्यार्थींनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

शाळेसारख्या विद्येच्या मंदिरात अशाप्रकारचे कृत्य एका शिक्षकानेच केल्याने समाजाममध्ये सदर शिक्षकाबद्दल मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments