नगर तालुक्यातील जेऊरच्या डोंगरावरील सौर ऊर्जा प्रकल्पातून चोरी


नगर तालुका (प्रतिनिधी) - जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, नगर तालुक्यातील जेऊर परिसरातील एका सौर ऊर्जा प्रकल्पातून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीची ८२ मीटर लांबीची कॉपर केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जेऊर येथील घुरुडी डोंगरावर एका सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. २७ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत चोरट्याने संधी साधून कंपनीच्या परिसरातील सुमारे ८२ मीटर लांबीची हिरव्या पोपटी रंगाची कॉपर केबल चोरून नेली. या चोरीला गेलेल्या केबलची किंमत अंदाजे ४० हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी ज्ञानदेव भाऊसाहेब पायमोडे (वय ४६, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३() प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पालवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments