संतापजनक... माजी सरपंचाकडून ग्रामसेविकेचा विनयभंग; ग्रामसेवक संघटना आक्रमक

 


कोपरगाव - तुम्ही खूप छान दिसता, तुम्ही इथे आल्यापासून मला खूप आवडतात. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्या बायको मुलापेक्षा तुम्ही मला जास्त आवडतात, असे म्हणत हात धरल्याचा प्रकार अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडला आहे. माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांनी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत शासकीय सेवेत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 14 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, माजी सरपंच भोकरे दीड ते दोन वर्षांपासून मला वारंवार फोन करून तुम्ही आज छन साडी घातली. खूप छान दिसतात. कधीकधी तुम्ही खूप सुकलेल्या दिसतात. आज खूप टेंशन आहे का? मी येऊ का टेंशन दूर करायला म्हणून माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असून सदर इसमा विरुद्ध माझी तक्रार आहे असे म्हणत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक न झाल्याने, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देऊन आरोपीला दोन दिवसांत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतरही पोलिस कारवाईत विलंब होत असल्याचा आरोप करत, संघटनेने या प्रकरणी तातडीने पावले उचलण्याची आग्रही विनंती प्रशासनाकडे केली आहे.

या प्रकरणात आरोपीला दोन दिवसांत अटक न झाल्यास 'काम बंद' आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने निवेदनाद्वारे पोलिसांना दिला असून, या पवित्र्यामुळे आता पोलिस प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित आरोपीच्या मुसक्या कधी आवळल्या जातात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments