पारनेर - पारनेर येथे स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि ‘कामाच्या माणसाला कामातूनच श्रद्धांजली’ या भावनेतून खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कृषी प्रदर्शन १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पारनेर बाजार समिती शेजारील मैदानावर भरविण्यात येणार आहे. खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ४ फेब्रुवारी रोजी पारनेर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, बी-बियाणे, रासायनिक, सेंद्रिय व जैविक खते, औषधे, ठिबक सिंचन, शेततळी, दूध काढणी यंत्रे, कुक्कुटपालन, शेळीपालन, मधमाशी पालन, रोपवाटिका, पशुआहार आदी शेती व शेतीपूरक व्यवसायांशी संबंधित सर्व साहित्य व माहिती उपलब्ध होणार आहे. यासोबतच कांदा व ऊस पिकवाढीबाबत मार्गदर्शन तसेच नव्या ए.आय. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात कृषी विद्यापीठ, जिल्हा व तालुका कृषी विभाग, आत्मा योजना तसेच विविध शासकीय बँकांचे माहितीपर स्टॉल्स असणार असून, शासकीय योजनांचा लाभ व तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणून जगातील एकमेव आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली अवघी २ फूट ८ इंच उंचीची ‘राधा’ ही जगातील सर्वात बुटकी म्हैस पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
महिलांसाठी गृहउपयोगी वस्तूंची दालने, लहान मुलांसाठी किड्स झोन तसेच सांगली, कोल्हापूर व कोकण भागातील प्रसिद्ध खाऊ गल्लीचे स्टॉल्सही या ठिकाणी असणार आहेत. या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा लाभ पारनेर तालुक्यासह अहिल्यानगर, श्रीगोंदा, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना होणार असून, सर्व शेतकरी, नवउद्योजक तरुण व महिलांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात प्रगतिशील आदर्श शेतकरी, आदर्श शिक्षक, आदर्श उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते, आदर्श सरपंच, आदर्श दुधडेअरी, आदर्श सहकारी सोसायटी हे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहेत. तर प्रदर्शनाला भेट देणाल्या शेतकरी बांधवांसाठी खास दर एक तासाला लकी ड्रॉ आयोजीत करणार आहोत
या कृषी प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन गेल्या ११ वर्षांपासून महाराष्ट्रात कृषी प्रदर्शनांचे आयोजन करणाऱ्या पी.जे.एम. इव्हेंट मॅनेजमेंट, काष्टीचे बंडू पाचपुते व गणेश जठार यांनी केले आहे. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment