पारनेर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला, दोन जण जखमी, नागरिकांमध्ये घबराट



पारनेर - पारनेर तालुक्यातील पळशी नागपूरवाडी (आदिवासी भाग) येथे मंगळवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन ग्रामस्थ जखमी झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमींमध्ये दुर्योधन मेंगाळ आणि सचिन डुकरे यांचा समावेश आहे. माहितीनुसार, दुर्योधन मेंगाळ यांच्या घराजवळ बिबट्याने अचानक हल्ला केला. दुर्योधन मेगाळ यांच्यावर प्रथम हल्ला झाला असून, त्यावेळी मदतीला आलेले सचिन डुकरे हेही जखमी झाले. दोघांनाही तात्काळ खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मात्र, जखमांची तीव्रता लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक सरपंच प्रकाश राठोड यांनी संताप व्यक्त करत वनविभागावर नाराजी दर्शवली. त्यांनी यापूर्वीच या भागात बिबट्या फिरत असल्याची माहिती देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वनविभागाचे कामकाज पूर्णपणे थंडावले आहे. वारंवार घटना घडत आहेत, तरीही ठोस उपाययोजना होत नाहीत, अशी टीका सरपंच राठोड यांनी केली.

पारनेर तालुक्यात गेल्या काही काळात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढल्या आहेत. ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, रात्री घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे. स्थानिकांनी वनविभागाकडून तातडीने पिंजरा लावणे, नियमित पाहणी आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या सूचना देण्याची मागणी केली आहे.


 

0/Post a Comment/Comments