तुमची निर्मला... निवडणुकीतील पराभवानंतर माजी सरपंच निर्मला नवलेंची पहिली प्रतिक्रिया



पुणे : सोशल मीडियावरील रील स्टार सरपंच म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. मात्र, या निवडणुकी त्यांचा 329 मतांनी पराभव झाला. निर्मला नवले या सोशल मीडियावर लोकप्रिय असून त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. निर्मला नवले यांची स्टाईल, वक्तव्याचे व कृतीचे त्यांच्या चाहत्यांना अप्रूप असते. त्यामुळेच, केवळ पंचायत समिती गणातीलच नाही, तर सोशल मीडियातील त्यांच्या चाहत्यांनाही येथील निकालाची उत्सुकता होती. आता, या पराभवानंतर निर्मला नवले यांनी प्रतिक्रिया दिली.    

माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या, आणि माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या, मी निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील दोन महिने आपण सर्वांनी जे अथक परिश्रम घेतले, रात्र-दिवस एक करून जे कष्ट उपसले-त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे, असे निर्मला नवले यांनी म्हटले. तसेच, तुमच्या या साथीनं मला पुन्हा उभं राहण्याची, नव्या जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद दिली आहे. ही लढाई इथे थांबत नाही... तुमच्यासोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे, अशी प्रतिक्रिया निर्मला नवले यांनी इंस्टाला स्टोरीला ठेऊन दिली आहे. दरम्यान, निर्मला नवले यांचा भाजपच्या मनिषा पाचगेंनी पराभव केला आहे.

निर्मला नवलेंचे 5 लाख फॉलोअर्स

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वर्किंग प्रेसिडेंट एनसीपी युवती महाराष्ट्र असा पदाचा उल्लेख निर्मला नवलेंनी केला असून त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर त्या निवडणूक लढवत होत्या. निर्मला नवले या राजकारणी असल्या तरी इन्स्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. उच्चशिक्षित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून निर्मला नवले या कायम चर्चेत असायच्या. मात्र, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत निर्मला नवले यांची जादू चालू शकली नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. पुण्यात एकही मोठी सभा झाली नव्हती. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळाल्याचे चित्र निवडणूक निकालातून दिसून आले.


 

0/Post a Comment/Comments