शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 57.75 लाखांची फसवणूक; पसार आरोपीला वर्षभरानंतर बेड्या



अहिल्यानगर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांना मासिक 8 ते 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 57 लाख 75 हजार रूपयांची फसवणूक करणार्‍या संशयित आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. जानेवारी 2025 पासून पसार असलेला लक्ष्मण राजू पातकळ (वय 27, रा. चापडगाव, ता. शेवगाव) याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात 27 जानेवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दामू ऊर्फ दामोधर लक्ष्मण विघ्ने (वय 65, रा. मंगरूळ बु., ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार करीत आहेत. लक्ष्मण पातकळ याने दत्तकृपा ट्रेडिंग या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा व्यवसाय सुरू केल्याचा भास निर्माण केला होता. गुंतवणूकदारांना दरमहा 8 ते 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादी व इतर ठेवीदारांकडून एकूण 57 लाख 75 हजार रूपये स्वीकारण्यात आले.

मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता तसेच मूळ रक्कमही परत न करता संशयित आरोपीने ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून पसार झाला होता. तो जानेवारी 2025 पासून पसार होता व त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व माहितीदारांच्या मदतीने त्याचा शोध सुरू ठेवण्यात आला. तपासादरम्यान तो वरूड फाटा परिसरात, चिखलठाणा पोलीस ठाणे हद्दीत (जि. छत्रपती संभाजीनगर) असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक पवार, पोलीस अंमलदार कावरे, आव्हाड व फडतडे यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. न्यायालयाने 20 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.

0/Post a Comment/Comments